उज्ज्वल निकमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केलं होतं. जे खोटं होतं. त्यांनी ते नंतर मान्य केलं. असला बेईमान माणूस आहे तो, हा वकील नाही तर देशद्रोही आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
गुरुवारी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं देत होते. ते म्हणाले की, ॲड. उज्ज्वल निकम यांनी मुंबई दहशवादी हल्ला प्रकरणी न्यायालयात जे पुरावे सादर करायला हवे ते सादर केले नाहीत. शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. ती गोळी संघाशी (आरएसएस) संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवलं. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा जोरदार निशाणा वडेट्टीवार यांनी साधला. अशा देशद्रोह्यांना जर भाजप तिकीट देत असेल तर भाजप हा देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो असंही वडेट्टीवार म्हणाले.