हे असंवेदनशील सरकार; शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री सत्तेच्या मस्तीत, विजय वडेट्टीवार यांची टीका

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकार पळ काढत आहे. जाहिरनाम्यात उल्लेख असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येणार नाही, 31 मार्चपूर्वी पैसे भरा असे म्हटले होते. यावरून टीकेची झोड उठलेली असतानाच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या शेतकऱ्यांना सुनावले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

कृषिमंत्र्यांची जबाबदारी मोठी असते. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. नाशिक भागातही डाळिंब, कांद्याचे नुकसान झाले आहे. पिक हातात जात असताना कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणे गरजेचे होते. पण हे सरकार असंवेदनशील आहे. सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. यांना जनतेशी काहीही देणेघेणे उरलेले नाही, म्हणून ही भाषा वापरली जात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

मूळ मुद्द्याला बगल देऊन नवीन मुद्दे काढणे सुरू आहे. जनतेशी काहीही देणेघेणे नसलेले हे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी यांना फरक पडत नाही. आमच्याकडे प्रचंड बहुमत आहे, आमचे कोण काय वाकडे करणार अशा मिजाजमध्ये आणि मस्तीमध्ये वागणारे हे सरकार आहे, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.

कर्जमाफी मिळाल्यावर पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या सवालाने शेतकरी संतप्त