निवडणुका झाल्या, मतं मिळाली; आधी लाडक्या बहिणी अपात्र केल्या, आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार!

विधानसभा निवडणुकीआधी आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महायुती सरकारकडून निकषांची कात्री लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक बहिणी अपात्र ठरणार आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडालाही पाने पुसली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीचे जाहीर आश्वासन देणारे सरकार आता यामुळे तिजोरीवर भार पडू शकतो अशी पळवाट काढताना दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात अडकले आहे. निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं ‘जाहीरनामा’ म्हणून जनतेसमोर ठेवली गेली, ती सर्व गाजरं होती, म्हणून आता अर्थमंत्र्यांच्या मते शेतकरी कर्जमाफी ‘तिजोरीवरचा भार’ ठरू शकते. आधी वचन देणे आणि नंतर निधीचे कारण देऊन ती पूर्ण न करणे हा जनतेचा विश्वासघात नाही का? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि विश्वासाचे आदर करणारे हे सरकार नाही, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारने निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण आता त्यांची पैसे देण्याची औकात नाही. उलट या योजनेतील महिलांची संख्या सरकार कमी करत आहेत.

शेतकरी कर्जमाफीवरून देखील मंत्री म्हणत आहेत की आम्ही असे आश्वासन दिले नव्हते. म्हणजे मलिदा खाण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येणार पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आली की कारणे देऊन जबाबदारी झटकायचे हे योग्य नाही. सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे आता सरकारने पळ काढू नये, बेइमानी करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

सरकार एसटी, रिक्षा, टॅक्सी भाववाढ करतील. चार वर्ष लोकांकडून पैसे घेतील आणि निवडणुका आल्या की एक हजार रुपये वाटून मत घेतील हेच या सरकारचे काम आहे, टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

‘लालपरी’चा प्रवास महागला; एसटीच्या तिकीटदरात 15 टक्के वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार