मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार; RTO मधील भ्रष्टाचारावरून विरोधक आक्रमक

प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओचा 125 कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या खात्यात हा झालेला भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी आरटीओमधील भ्रष्टाचाराला वाचा फोडली.

वडेट्टीवार म्हणाले की, अंधेरी आरटीओ ने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे 76 हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत. अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे येथे घटलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत. दोन दुचाकींवर 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर 35 हजार 361 ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

माणसं मेली तरी आरटीओना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू असल्याची टीका करत वडेट्टीवार यांनी चौकशीची मागणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गडचिरोलीत आरोग्य विभागाचे धिंडवडे

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कोरोली या गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाला रूग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

वेळेत रूग्णवाहिका मिळाली असती तर मुलाचा जीव वाचला असता. या घटनेची माहिती घेतली असता. गडचिरोलीत आरोग्य विभागाची 70 टक्के पदे रिक्त आहेत अशी माहिती मिळाली. ही पदे रिक्त असल्याने डॉक्टर उपस्थित राहत नाही. रूग्णांना योग्य ती सेवा मिळत नाहीत. रूग्णवाहिकेच्या वाहन चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.