मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्याचा एन्काऊंटर होऊ शकतो – विजय वडेट्टीवार

 बीड प्रकरणासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज मोठा दावा केला. मोठय़ा आकाला वाचवण्यासाठी छोटय़ा आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीवरून वडेट्टीवार यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याला दूर करून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, पण पोलिसांना माझी विनंती आहे की छोटय़ा आकाचा एन्काऊंटर करू नका. कारण मोठय़ा आकापर्यंत जाण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. नाहीतर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे.’’

सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना एसआयटी आज बीडमध्ये दाखल झाली. त्यावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. सीआयडीने आतापर्यंत या प्रकरणाचा तपास केला असताना तो भरकटवण्यासाठी एसआयटी आणली का? सीआयडीने वाईट काम केले म्हणून एसआयटी नेमली का? असे ते म्हणाले.

धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांना मंत्रीपद

बीड प्रकरण इतके तापले असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार मौन बाळगून आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाही अजितदादांनी अद्याप त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे कदाचित धनंजय मुंडे यांची विकेट काढून छगन भुजबळ यांना त्यांच्या जागी मंत्रीपद दिले जाऊ शकते, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला. मुंडेंना हटवून भुजबळांना आणले गेले तर भुजबळांची नाराजीही दूर होऊ शकते आणि मुंडेंमुळे सरकारवर होणाऱया टीकेतूनही बचाव होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा पर्याय वापरू शकतात असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

गृहमंत्र्यांनी लक्ष दिले नाही तर पोलीस विभागाचे वाटोळे होईल

वाल्मिक कराडला पोलीस पकडू शकले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, वाल्मिक कराडलाच बॉस आणि बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते. 22 दिवस पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, नाहीतर पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.