
राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे. याप्रकरणी राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडी आज बैठकीला जाणार नाही. राज्य शासनाने आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली.
राज्यात आरक्षण प्रश्नावर आंदोलन सुरू असताना आंदोलकांसोबत केलेली चर्चा, दिलेले आश्वासन शासनाने सभागृहात मांडावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नेमकी काय चर्चा झाली होती ती राज्यातील जनतेला कळली पाहिजे. आरक्षण प्रश्नी शासनाने दोन्ही समाजांचे समाधान होईल असा तोडगा काढावा. सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीने घेत बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.