मारकडवाडीमध्ये मॉक पोल घेणाऱ्या ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटकही झाली आहे. याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शनिवारी विधीमंडळात शपथ घेतली नाही. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून पितळ उघडे पडेल म्हणून मारकडवाडीतील ‘मॉक पोल’ला विरोध करत आहेत का? असा सवाल केला आहे.
विधीमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एवढ्या बहुमताचा आकडा पार केल्यानंतर राज्यात जे वातावरण दिसायला हवे ते कुठेही दिसत नाही. निकालानंतर कुठेही उत्साह नाही. महाराष्ट्रात शोककळा पसरल्यासारखे वातावरण आहे. म्हणजे हे बहुमत कुणी दिले. हे बहुमत जनतेने दिले असते तर जनतेत उत्साह असता. परंतु तो दिसत नाही. याचा अर्थ दाल मै कुछ काला है, असा संशय आहे.
स्वच्छ, पारदर्शकपणे, लोकांनी दिलेल्या मतदानाप्रमाणे सरकार आले असते तर मारकडवाडीतील लोकांनी घेतलेल्या मॉक पोलला विरोध करायचे कारण नव्हते. पितळ उघडे पडेल म्हणून मारकडवाडीला विरोध का करत आहेत? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मारकडवाडीमध्ये धरपकड, लाठीमार सुरू आहे. मॉल पोलपासून लोकांना परावृत्त करायचे काम सुरू आहे. गावकऱ्यांना मॉक पोल घेण्याचा अधिकार आहे. तिथून निवडून आलेल्या आमदारानेही संशय व्यक्त केला असून मॉक पोलला समर्थन दिलेले आहे. जिंकलेला उमेदवार बॅलेट वर निवडणुका घ्या सांगत आहे, तरी विरोध केला जात आहे. याचा अर्थ सरकार घाबरत असून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे.
पाशवी बहुमत हा जनाधार नाही! महाविकास आघाडीचा सभात्याग, शपथविधीवर बहिष्कार
निवडणूक आयोगाने पारदर्शकता ठेवली नाही असा अनेकांना संशय आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू झाले आहे म्हणून आजच्या दिवस आम्ही शपथ घेणार नाही. मारकडवाडीतील गावकऱ्यांना घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा असून सरकारने उचललेल्या पावलाचा निषेध म्हणून आम्ही शपथ घ्यायची नाही, असा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार म्हणाले.