महायुतीचे सरकार बळीराजाचे नाहीच, कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आणि महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, ”आमच्या बळीराजाला भिकारी म्हणून बाजूला करणारे महायुतीचे सरकार आहे.” X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ”शेतकऱ्यांना भिकारी बोलून महायुती सरकारने त्यांना आता पूर्णपणे दुर्लक्षित केले. महायुतीचे सरकार हे बळीराजाचे नाही यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत, शेतकऱ्यांची अवहेलना भिकारी म्हणून केली आहे.”

ते म्हणाले, ”शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, पीकविमा योजनेत भ्रष्टाचार करतात आणि आता थेट शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात महायुतीची नियत ही समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या असंवेदनशील मंत्र्याची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.”