कुणाल कामराने वस्तुस्थिती मांडली, सत्ताधाऱ्यांना राज्य ठोकशाहीने चालवायचे आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. कुणाल कामराने त्याच्या गाण्याच्या विडंबनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ही टीका मिंधे गटाला चांगलीच झोंबली असून त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. यावरूनच आता काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कुणाल कामराच्या कवितेत एकही शब्द दुखावेल असे नव्हते. त्यांनी वस्तुस्थिती मांडली, तरी सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली, अशी टीका त्यांनी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी टीका सहन करायची तयारी ठेवली पाहिजे. सत्ताधाऱ्यांना राज्य ठोकशाहीने चालवायचे आहे का?”, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ते म्हणाले आहेत की, “ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला त्यांचे तोंड आणि घर सत्ताधाऱ्यांनी कधी फोडले नाही. आज मात्र स्वतःवर थोडीशी टीका होताच कलाकारांचे स्टुडिओ फोडतात.”