उद्या देश कायदा आणि संविधानावर चालेल का? विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला संशय

राज्यातला हा निकाल अनपेक्षित आहे असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच उद्या हा देश कायदा आणि संविधानावर चालेल का अशी शंकाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केली.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सहाव्यांदा विधानसभेत जातोय, माझी भुमिका ही विरोधकाचीच आहे. माझी भुमिका महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडेन.

तसेच हा निकाल अनपेक्षित आहे. माध्यमांनी जे सर्वे केले त्यापेक्षाही हे सर्वे वेगळे निघाले. सरकारविरोधात आक्रोश होता, महागाईने जनता झुंजत होती, महाराष्ट्रातल्या जनतेला बदल हवा होता हे त्यांच्या देहबोलीतून दिसत होता. जनतेच्या प्रतिक्रियेतून असं दिसतंय की दाल में कुछ तो काला है. हे होऊ शकत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत. यावर घाईने प्रतिक्रिया देणार नाही. भाजपचा स्ट्राईक रेट हा जवळपास 100 टक्के आहे. याचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी विचारला.

2014 मध्ये मोदी लाट असताना आम्ही 44 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये ही लाट असताना आम्ही 45 जागा आणल्या होत्या. पण आताचा निकाल अशक्य आहे हे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे याची कारणे ही शोधली जावीत, अन्यथा सगळ्यांना रान मोकळं राहिल, नावाला लोकशाही राहिल आणि हुकुमशाही पद्धतीने काम सुरू राहिल. लोकशाहीत विरोधकांचा सत्तेवर अंकुश असला पाहिजे. पण विरोधकांना संपवून लोकशाही मजबूत करण्याचे दाखवत असेल तर ती केव्हाच संपेल. उद्या देश कायदा आणि संविधानावर चालेल का, ज्यांच्या मुखातून जे निघेल त्यालाच कायदा समजून म्हणून चालवावा लागले हा सुद्धा मोठा प्रश्न आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.