महायुती सरकार हे जनतेसाठी की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी? विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेला तीन एकर जमीन का देण्यात येत आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पशू संवर्धन विभागाने आपल्या मालकीची गोरेगावमधील तीन एकर जागा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. तसा शासकीय आदेशही सोमवारी दुपारी शासकीय संकेतस्थळावर जारी झाला. मात्र संध्याकाळी हा आदेश संकेतस्थळावरून हटविण्यात आला. यावरून विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणतात की, “भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेला तीन एकर जमीन का देण्यात येत आहे? महायुती सरकार हे जनतेच आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी आहे? आधी शासन निर्णय काढला, मग शासकीय संकेस्थळावरून का हटवला? चोरी जनतेपासून लपविण्यासाठी शासन निर्णय संकेतस्थळावरून हटवला आहे की निर्णय ही रद्द करण्यात आलेला आहे? याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे असा जाब वडेट्टीवार यांनी विचारला आहे.