विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे ब्रेकअप! वाचा प्रेमापासून ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास

चित्रपट सृष्टीमधील कपल्सचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे. असाच चाहता वर्ग आहे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या दोघांचा. तमन्ना भाटिया आणि विजय दोघंही अगदी मेड फाॅर इच अदर वाटायचे, परंतु सध्याच्या घडीला दोघांमधील बेबनाव आता चाहत्यांपुढे आलेला आहे. तमन्ना आणि विजय या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहते नाराज झाले आहेत. २०२३ मध्ये तमन्नाने तिच्या आणि विजयच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितले होते. परंतु सध्याच्या घडीला मात्र दोघांनीही एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तमन्ना आणि विजय या दोघांची पहिली भेट ही एका पार्टीमध्ये झाली होती. विजय वर्माने आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये केवळ ४ जण उपस्थित होते. त्यापैकी एक होती तमन्ना. दोघांमध्ये ओळख झाली, परंतु या ओळखीचं प्रेमात रुपांतर व्हायला अवघे २० ते २५ दिवस लागले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत डेटिंगला सुरुवात केली होती.

तमन्ना भाटिया ही विजय वर्माच्या प्रेमात आकंठ बुडालेली पाहायला मिळायची. म्हणूनच ती अगदी लोकांमध्ये असतानाही विजयसोबतच्या नात्यावर अगदी मोकळेपणाने बोलायची. विजय तिचा हॅपी प्लेस असल्याचे ती सतत सांगायची. त्यामुळेच विजय वर्मा आणि तमन्ना दोघंही चांगल्या कारणांसाठी चर्चेत असायचे.

ब्रेकअपनंतर यांनी दोघांचे एकत्र असलेले सोशल माध्यमावरचे फोटोही डिलीट केल्यामुळे, आता या चर्चेला एक पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनी ब्रेकअपबद्दल चकार शब्द काढला नाही हेही तितकेच खरे आहे. दोघेही सध्या शूटींगमध्ये व्यस्त असून, त्यांनी या घटनेवर काहीही स्टॅंड घेतला नाही.