चंद्रपूरचा बीड करायचा नाही! डीपीडीसीच्या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचा दावा

मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील वाळू, राखमाफियांच्या दहशतीच्या घटना एकामागून एक उघड होऊ लागल्या आहेत. भाजपचे चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डीपीडीसीच्या बैठकीत ‘चंद्रपूरचा बीड करायचा नाही’ असे म्हणाल्याचा दावा कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

बीडमधील परिस्थिती किती भयावह आहे याची कल्पना भाजपच्या नेत्यांनासुद्धा आहे. डीपीडीसीच्या बैठकीत मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून तेच दिसतंय, असे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, मुनगंटीवार यांनी, एका सरपंचासोबत जो प्रकार बीडमध्ये घडला. अमानवी, निर्घृण घटना तिथे घडली, तशी घटना चंद्रपुरात होता कामा नये. यासाठी असं आपल्या बोलण्याचा अर्थ असल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. हळूहळू इकडे कोळसामाफिया, वाळूमाफिया यांचा उपद्रव वाढताना दिसत आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षकांची मागणी बैठकीत आली, त्यासंदर्भाने चर्चा करताना मी खबरदारी घेण्यास सांगितल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

z आमच्याकडे हळूहळू कोळसा, वाळू, दारू, ड्रग्जमाफिया वाढले आहेत. आज आमच्याकडे अमानुष, अमानवी, निर्घृण प्रकार होत नाहीत. पण या माफियांना आज पायबंद घातला नाही, पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीनं वापरली गेली नाही. त्यांना पायाभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत. पोलीस निरीक्षकांची संख्या कमी असेल, फॉरेन्सिकचे कर्मचारी कमी असतील तर पुढे समस्या निर्माण होऊ शकते, असं मुनगंटीवार म्हणाले.