विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाच्या सुरुवातीलाच बीड आणि परभणी वरून विधानसभेत गदारोळ झाला. या दोन्ही घटनांवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्यामुळे काँग्रेसकडून सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
“बीडमध्ये सरकार व मंत्र्यांच्या संरक्षणात एक गुंडा खुलेआम धमक्या देत आहे. बीडमधील मस्साजोगच्या सरपंचाची अमानुषपणे हत्या करण्यात आली. एवढं भीषण कृत्य मी कधी पाहिलं नाही. लायटरनं त्याचे डोळे जाळले गेले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं. हे काय चाललंय महाराष्ट्रात? हे काय बघतोय आपण?” असे वडेट्टीवार म्हणाले.
सत्ताधाऱ्यांना एवढं पाशवी बहुमत लोकांचा जीव घेण्यासाठी दिलंय का?, असा सवाल देखील यावेळी वडेट्टीवारांनी केला.