Vijay Hazare Trophy – विदर्भच्या कर्णधाराची बॅट तळपतेय, 664 ची सरासरी आणि ठोकलीयेत 5 खणखणीत शतके

विजय हजारे करंडकात विदर्भाच्या संघाने सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. 16 जानेवारीला महाराष्ट्रासोबत त्यांचा सामना होईल. या संपूर्ण हंगामात विदर्भचा कर्णधार करुण नायरने गोलंदाजांना अक्षरश: रडवलं आहे. त्याने 6 डावांमध्ये 664 च्या सरासरीने तितक्याच धावा चोपून काढल्या आहेत.

करुण नायरच्या तुफान फटकेबाजीमुळे विदर्भच्या संघाने विजय हजारे करंडकाच्या सेमी फायनलमध्ये रुबाबात एन्ट्री मारली आहे. करुण नायरने स्पर्धेत सहा डावांमधील पाच डावांमध्ये शतके ठोकली आहेत. त्याने पहिल्या डावात 112 धावा, दुसऱ्या डावात 44 धावा, तिसऱ्या डावात 163, चौथ्या डावात 111 धावा, पाचव्या डावात 112 धावा आणि सहाव्या डावात 122 धावांची धडाकेबाज खेळी केली आहे. विजय हजारे करंडकाच्या एकाच हंगामात पाच शतके ठोकून त्याने आता एन. जगदीशनची बरोबरी केली आहे. 16 जानेवारीला महाराष्ट्राविरुद्द त्याचे बॅट तळपणार का हे पाहण्यासाठी चाहते सुद्दा उत्सूक आहेत.

करुण नायरने 2016 साली झिम्बाब्वेविरुद्ध पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दोन वनडे सामन्यांमध्ये त्याने 46 धावा केल्या होत्या. त्याच बरोबर त्याच वर्षी इंग्लंडविरद्ध मोहालीमध्ये 303 धावांची ऐतिहासिक खेळी त्याने केली होती. त्यामुळे त्याच्या कडून संघाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु त्यानंतर त्याचा खेळ अगदीच सुमार राहिला, त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. करुणने टीम इंडियाकडून 6 कसोटी सामन्यांमध्ये 374 धावा केल्या असून त्याने शेवटची कसोटी 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती.