आयुष म्हात्रेच्या 93 चेंडूंतील 148 धावांच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईने सौराष्ट्रचा 24 चेंडू आणि 5 विकेटनी सहज पराभव केला. मात्र या विजयानंतरही मुंबईचे विजय हजारे करंडकाच्या साखळीतच आव्हान संपुष्टात आले. मुंबईला साखळीत पंजाब आणि कर्नाटकविरुद्ध पराभवाची झळ बसली होती. त्यामुळे ‘क’ गटातून पंजाब आणि कर्नाटक हे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. तसेच विजयाचा षटकार ठोकणारे महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. आता उपउपांत्यपूर्व फेरीत येत्या गुरुवारी हरयाणा-बंगाल आणि राजस्थान-तामीळनाडू अशा लढती रंगतील.
आज मुंबईला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठय़ा विजयाची गरज होती. तसेच पंजाब आणि कर्नाटक यापैकी एकाचा पराभव मुंबईसाठी आवश्यक होता. मात्र कर्नाटकने नागालॅण्डचा तर पंजाबने पुद्दुचेरीचा दारुण पराभव करत 24 गुणांसह ‘क’ गटातून आपला उपांत्यपूर्व फेरीचा प्रवेश निश्चित केला. मुंबईने सौराष्ट्रचे 290 धावांचे आव्हान लीलया गाठले. आयुषने आपला शतकी घणाघात कायम ठेवताना सलामीवीर जय बिश्तासह 141 धावांची सलामी दिली. आयुषने आपल्या खेळीत 9 षटकार आणि 13 चौकारांचा वर्षाव करत मुंबईला विजयपथावर नेले होते. तो बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी छोटय़ा-छोटय़ा खेळय़ा करत मुंबईला 46 व्या षटकांतच विजयी लक्ष्य गाठून दिले. आयुषने नागालॅण्ड विरुद्धही 181 धावांची तडाखेबंद खेळी केली होती.
स्पर्धेत सलग सहा विजय नोंदविणाऱया महाराष्ट्राला आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात रेल्वेकडून 32 धावांनी हार सहन करावी लागली. मात्र या पराभवानंतरही महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले. त्याचप्रमाणे गटात अव्वल स्थान संपादत गुजरात, विदर्भ आणि बडोदा या संघांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साखळीत विदर्भ आणि गुजरात हे दोनच संघ अपराजित राहिले आहेत. गुजरातने आपले सर्वच्या सर्व सातही सामने जिंकलेत.