IPL मध्ये अनसोल्ड, टीम इंडियातून बाहेर; विजय हजारे करंडकात ‘या’ खेळाडूने केली शतकांची हॅट्रीक

एकीकडे टीम इंडियाचे खराब प्रदर्शन सुरू आहे, तर दुसरीकडे हिंदुस्थानात विजय हजारे करंडकाचा धमाका सुरू आहे. याच दरम्यान आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या आणि टीम इंडियामध्ये स्थान न मिळालेल्या मयंक अग्रवालने सलग तीन सामन्यांमध्ये तीन शतके ठोकत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.

विजय हजारे करंडकामध्ये मयंक अग्रवाल कर्नाटक संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अगदी चोख पार पाडत आहे. पहिल्या सामन्यापासूनच त्याने विस्फोटक फटकेबाजी करत आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली. त्याने पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध 127 चेंडूंमध्ये 139 धावांची तुफान खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध 100 धावा आणि तिसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 112 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 124 धावा चोपून काढल्या. पहिले दोन्ही सामने कर्नाटकने जिंकले असून तिसरा सामना सध्या सुरू आहे. मयंकच्या धुवाँधार फलंदाजीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याने आपली दावेदारी सिद्द केली आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघाची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विजय हजारे करंडकामध्ये खेळाडू धमाकेदार प्रदर्शन करत आपली दावेदारी सिद्द करत आहेत. मयंक अग्रवाल दोन वर्षांपासून संघातून बाहेर आहे. त्याने 2022 साली शेवटचा कसोटी सामना आणि 2020 साली शेवटचा वनडे सामना टीम इंडियासाठी खेळला होता. त्याच बरोबर IPL च्या लिलाव प्रक्रियेमध्ये सुद्दा त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. मात्र विजय हजारे करंडकात त्याने आपला दमदार खेळ दाखवत टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.