अहमदाबादमध्ये आयुष, अभिषेकचा ‘रनोत्सव’; आयुष म्हात्रेने 181 धावा ठोकत रचला विश्वविक्रम

विजय हजारे करंडकानिमित्त अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या सामन्यात मुंबई, पंजाब आणि सौराष्ट्र संघांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. 16 वर्षीय आयुष म्हात्रेने 117 चेंडूंत 15 चौकार आणि 11 षटकारांचा वर्षाव करीत 181 धावा फोडून काढत दुबळ्या नागालॅण्डचा 189 धावांनी दारुण पराभव केला. तसेच आयुषने वयाच्या 17 वर्षे 168 व्या दिवशी दीडशतकी खेळी करत त्याने यशस्वी जैसवालचा (17 वर्षे 291 दिवस) दीडशतकाचा विश्वविक्रम मोडीत काढला. त्याचप्रमाणे अहमदाबादच्याच गुजरात कॉलेज ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात पंजाबने अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांच्या वैयक्तिक शतकांसह 298 धावांच्या सलामीच्या जोरावर बडोद्याविरुद्ध 424 धावांचा डोंगर उभारला होता तर बडोद्याने अर्पित वसावडाच्या शतकामुळे 367 धावांपर्यंत मजल मारत अहमदाबादमध्ये ‘रनोत्सव’ कायम ठेवला.

मुंबईने आज नागालॅण्डच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई करत 50 षटकांत 7 बाद 403 अशी जोरदार मजल मारली. आयुष म्हात्रे आणि अंगक्रिष रघुवंशीने (56) 25 षटकांत 156 धावांची सलामी दिली. त्यानंतर आयुषने वादळी फटकेबाजी करत नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. तळाला फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरने 28 चेंडूंत 8 षटकार आणि 2 चौकार खेचत नाबाद 73 धावांची अभूतपूर्व खेळी करत मुंबईला 403 पर्यंत नेले. मुंबईच्या 404 धावांचे आव्हान नागालॅण्डला पेलवलेच नसल्यामुळे त्यांनी 50 षटके फलंदाजी करण्यातच धन्यता मानली. त्यांच्या जगदीशा सुचितने 104 धावांची झुंजार खेळी करत संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला.

षटकार आणि शतकांचा पाऊस

पंजाब आणि बडोदा यांच्यात झालेल्या सामन्यात 32 षटकारांसह तीन शतकांचा पाऊस पडला. अभिषेक शर्माने 96 चेंडूंत 8 षटकार आणि 22 चौकार ठोकत 170 धावा चोपल्या तर प्रभसिमरनने 8 षटकार आणि 11 चौकार लगावत 125 धावांची खेळी केली. या दोघांनी 31 षटकांत 298 धावांची सलामी दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर 19 षटकांत पंजाबला केवळ 126 धावाच काढता आल्या. तरीही पंजाबने 5 बाद 424 असा धावांचा एव्हरेस्ट उभारला. बडोद्यानेही या धावांचा पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न केला. अर्पितने 104 धावा करत संघाच्या विजयासाठी झुंज दिली. पण तो बाद झाल्यानंतर बडोद्या अपेक्षित धावांची सरासरी गाठता आली नाही आणि बडोद्याला 57 धावांनी हार सहन करावी लागली.