हिंदुस्थानी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या मोहम्मद शमीच्या प्रभावी मार्यानंतरही बंगालला हरयाणाविरुद्ध 72 धावांनी हार सहन करावी लागली. तसेच राजस्थानने चुरशीच्या लढतीत तामीळनाडूचा 19 धावांनी पराभव करत विजय हजारे करंडकाच्या उपउपांत्य फेरीत धडक मारली. आता 12 जानेवारीला हरयाणा गुजरातविरुद्ध तर राजस्थान विदर्भविरुद्ध उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी भिडतील. त्याचप्रमाणे शनिवार, 11 जानेवारीला महाराष्ट्र-पंजाब आणि कर्नाटक-बडोदा अशा उपांत्यपूर्व लढती रंगतील.
राजस्थान आणि तामीळनाडू यांच्यातला सामना जोरदार झाला. सलामीवीर अभिजित तोमरच्या 125 चेंडूंतील 111 धावांच्या खेळीने राजस्थानला 267 धावांचे आव्हान उभारून दिले. तोमरने कर्णधार महिपाल लोमरोरसह दुसऱया विकेटसाठी 160 धावांची तडाखेबंद भागी रचली. या दोघांनी 130 चेंडूंत फटकेबाजी केल्यानंतर वरुण चक्रवर्थीच्या फिरकीने राजस्थानच्या धावांवर बंधने लादली. वरुणने 52 धावांत अर्धा संघ गारद केल्यामुळे मजबूत स्थितीत असलेल्या राजस्थानचा संघ 47.3 षटकांत आटोपला. त्यांचे शेवटचे सहा फलंदाज तर अवघ्या 52 धावांत बाद झाल्यामुळे राजस्थानला 300 धावांच्या आत गुंडाळण्याची किमया तामीळनाडूला साधता आली.
राजस्थानच्या 268 धावांचा पाठलाग करताना तामीळनाडूला तुषार रहेजा (11) आणि नारायण जगदीशनने (65) 7 षटकांत 60 धावांची सलामी दिली. मग बाबा इंद्रजीत (37), विजय शंकर (49) आणि मोहम्मद अली (34) यांनी तामीळनाडूला 35 षटकांत 185 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र विजयासाठी 15 षटकांत 83 धावांची गरज असताना तामीळनाडूने विजयासाठी कर्णधार साई किशोर आणि वरुण चक्रवर्थीने जोरदार प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. त्यांचा संघ विजयापासून 19 धावा दूर असताना 17 चेंडू आधीच आटोपला आणि राजस्थानने थरारक विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकली.
मोहम्मद शमीची मेहनत वाया
बंगालला उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी मोहम्मद शमीने जोरदार मारा केला. पण हरयाणाचे 299 धावांचे आव्हान बंगालला पेलवलेच नाही. पार्थ वत्स (62), निशांत सिंधू (64) आणि सुमित कुमार (नाबाद 41) यांच्या उपयुक्त आणि आक्रमक खेळीच्या जोरावर हरयाणाने 9 बाद 298 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. मोहम्मद शमीने 3 विकेट घेत आपली कामगिरी चोख बजावली. मुकेश कुमारनेही 2 विकेट घेतल्या. तरीही हरयाणा तीनशेसमीप जाण्यापासून कुणीच रोखू शकला नाही. हरयाणाच्या 299 धावांचा पाठलाग करताना अभिषेक पोरेलने कर्णधार सुदीप घुरमीच्या साथीने 70 धावांची सलामी दिली. पण त्यानंतर पोरेलने अनुस्तुप मजुमदारसह 59 धावांची भागी केली आणि संघाला 143 पर्यंत नेले. पण त्यानंतर पार्थ वत्सने झटपट 3 विकेट बाद करत बंगालचा डाव 44 व्या षटकांतच 226 धावांवर गुंडाळत हरयाणाला मोठ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून दिले.