उमेद : पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणाचा ‘संकल्प’!

>>सुरेश चव्हाण

जन्मत:च गुन्हेगार समजला जाणारा ‘पारधी समाज’ आजही दारिद्रय़ व अज्ञानाच्या खाईत खितपत पडलेला आणि अंधश्रद्धा, परंपरागतता यांच्या गर्तेत गुरफटलेला आहे. अशा या पारधी समाजातील भावी पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नगर जिह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या राशीन या गावचा एक तरुण विजय भोसले गेली आठ-नऊ वर्षे कठीण परिस्थितीतही जोमाने काम करत आहे.

नगर जिह्यातील कर्जत तालुका हा तसा दुष्काळी व मागास आहे. या तालुक्यात फासेपारधी, भिल्ल, भटके, धनगर, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याच तालुक्यातील राशीन गावातील उघडय़ा माळरानावरील पालामध्ये विजय भोसले याचा जन्म झाला. गुन्हेगारीचा शिक्का माथ्यावर घेऊन जन्मलेल्या या पारधी आदिवासी समाजात जन्माला येऊन चार दिवस होत नाहीत, तोच त्याच्या पालावर पहाटे पोलिसांची धाड पडली. पोलीस विजयच्या वडिलांना फरपटत पोलीस चौकीत घेऊन गेले. कारण कुठेतरी चोरीचा गुन्हा घडला होता. गावात कुठेही चोरी झाली तर पारधी समाजातील पुरुषांना पोलीस चौकीत न्यायची पद्धतच पडून गेलेली आहे. खरा गुन्हेगार सापडो वा न सापडो, पण या गरीब जमातीतील पुरुषवर्गाला पोलिसांचा त्रास आजही सहन करावा लागतो.

विजयच्या वडिलांना पोलीस घेऊन गेल्यावर चार दिवसांच्या विजयला झोळीत टाकून त्याची आई पोलीस चौकीत गेली व तिने पोलिसांना विचारले, “माझा मालक कुठे आहे?’’ तेव्हा पोलीस म्हणाले, “तुझा मालक पळून गेला.’’ तेव्हा त्याच्या आईला तिथे त्याच्या वडिलांच्या चपला दिसल्या. चपला दिसताच तिने आरडाओरड करायला सुरुवात केली व “तुम्ही माझ्या मालकाला मारून टाकलं आणि मला सांगताय की, तो पळून गेलाय.’’ तेव्हा पोलीस तिला म्हणाले, “काळजी करू नकोस एक-दोन दिवसांत तो घरी येईल. घाबरून तो पळून गेला.’’ असं तिला सांगून, गोड बोलून घरी जायला सांगितलं. त्यावर नाईलाजाने घरी परतून ती नवऱयाची वाट पाहू लागली.

दोन दिवसांनी एका माणसाकडून निरोप आला की, राशीन गावानजीक कुरणाची वाडी इथे ते आहेत. तिथे राहणारे देविदास महाराज मोढळे यांनी त्यांना आसरा दिला व त्यांना म्हणाले, “इथे वाडीत येऊन रहा व वाडीची राखण कर.’’ त्यांच्याकडून आश्वासन मिळाल्यावर विजयचे वडील रात्री पालावर आले व पालावर असलेली त्यांची भांडीकुंडी, फाटके-तुटके कपडे, चार मुलं, गाय व पत्नीसह विजयला झोळीत टाकून कुरणाच्या वाडीत रात्रीच राहायला गेले. तिथे त्यांनी पाल उभारलं व त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात झाली. विजयची आई त्याला झोळीत टाकून शेतकामावर जायची तसेच चार घरी मागून मुलांचं पोट भरत होती. वडील मोलमजुरी करत होते व मुलांना शाळेतही पाठवत होते. मोठा झाल्यावर विजय आपल्या भावंडांबरोबर शाळेत जात होता. आर्थिक परिस्थितीमुळे इतर भावंडे फारशी शिकली नाहीत, पण एका मुलाने तरी शिकावे असे त्याच्या आई-वडिलांना वाटत होते.

विजय शाळेत जात असताना इतर मुले त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत असत. त्याच्याशी कोणी मैत्री करत नव्हते. त्याच्या बरोबर कोणी खेळत नसत. कारण तो पारधी समाजातील असल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन वेगळा होता. शिवाय त्याच्या अंगावर स्वच्छ कपडे, पायात चपला नसायच्या. त्यामुळे त्याला मित्र नव्हते. त्याही परिस्थितीत तो शिकत राहिला व पुढे तो कॉलेजातही जाऊ लागला. तिथेही त्याला तोच अनुभव आला. या सगळ्यावर मात करून तो बीए झाला. शिकत असतानाच फावल्या वेळेत वडिलांबरोबर तो पानाच्या टपरीवर बसत असे. त्या पैशातून घराला मदत होत होती. बीएनंतर श्रीगोंदा येथे त्याने बीएडही केले. बीएड झाल्यावर त्याला शिक्षकाची नोकरी मिळत होती, पण ती त्याने स्वीकारली नाही. त्याला त्याच्या आपल्या समाजातील आजूबाजूला उपेक्षित जीवन जगणारी, भीक मागून खाणारी मुले दिसत होती. मुलींची तर लहानपणीच लग्न होत होती. यातील थोडी मोठी मुले ऊस तोडणीला व वीटभट्टीवर कामाला जात होती.

या मुलांसाठी काहीतरी करायला हवे, त्यांच्या राहण्याची व खायची सोय व्हायला हवी, असे विचार त्याच्या मनात यायला लागले. त्याने आई-वडिलांना सांगितले, “या मुलांसाठी मला काहीतरी करायचं आहे. आपण निदान तीन-चार मुलांना तरी आपल्या घरी ठेवू व त्यांना जेवणखाण देऊ. त्यांना शाळेत पाठवू.’’ काबाडकष्ट करून पानपट्टीच्या टपरीतून वडिलांना थोडेफार पैसे मिळत होते. आपला मुलगा जे करू पाहतोय, त्याला आपण साथ दिली पाहिजे, हे त्या अशिक्षित आई-वडिलांनी ठरवले. त्यांच्या घरी तीन-चार मुलांची राहण्याची व खायची सोय केली आणि इथूनच विजयच्या कामाला सुरुवात झाली.

सुरुवातीला त्याच्या घराच्या एका खोलीत त्याने आठ-नऊ मुलांना ठेवले व त्यांना शाळेत घातले. त्याचे हे काम पाहून गावातील डॉ. पंकज जाधव यांनी आपल्या दवाखान्याच्या बाजूचा हॉल मुलांच्या अभ्यासाकरिता व राहण्यासाठी दिला. हळूहळू गावातील काही लोकांना तो करीत असलेल्या कामाची माहिती झाली व गावातील दानशूर मंडळींनी त्याला धान्य व थोडी पैशांची मदत करायला सुरुवात केली. याचदरम्यान त्याचे लग्न झाले. त्याची पत्नी प्रणिता हीसुद्धा त्याच्या कामात त्याला मदत करू लागली. मुलांना जेवू घालण्याची जबाबदारी आता तिची होती. गेली नऊ वर्षे दोघे मिळून हे काम अगदी मनापासून करीत आहेत.

आई-वडिलांच्या छोटय़ाशा जागेत माळरानावर विजयने स्वतचे छोटेसे घर उभारले आहे व तिथेच बाजूला 41 मुलांची राहण्याची सोय केली आहे. या मुलांच्या शिक्षणाचा व जेवण-खाण्याचा खर्च लोकसहभागातून केला जातो. यासाठी त्याला खूप पायपीट करावी लागते. तो करीत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचवावे लागते. सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाही. पुण्याच्या वीणा गोखले यांच्या ‘देणे समाजाचे’ या संस्थेच्या उपक्रमातून त्याच्या ‘संकल्प’ या वसतिगृहाला बरीच मदत मिळाली आहे. त्याबरोबरीने या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या मुलांना राहण्यासाठी पक्की इमारत असावी, यासाठी या तरुणाची धडपड सुरू आहे.

[email protected]