
शरीरसौष्ठव खेळात दोन संघटनांचे खेळाडू एकाच मंचावर उतरूनही आपली ताकद दाखवू शकतात असे खेळाला प्रोत्साहन देणारे दृश्य पसायदान श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने दिसले. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सदैव बांधिलकी जपणाऱ्या पसायदान मुंबई संस्थेच्या पुढाकाराने बृहन्मुंबई हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनांनी एकत्रित येऊन आयोजित केलेल्या स्पर्धेत वजनी गटाच्या संघटनेतून खेळायला आलेल्या अमरावतीच्या विजय भोईरने बाजी मारत पसायदान श्रीचा मान मिळवला.
आजच्या युवा पिढीमध्ये फिटनेसविषयी जागृती निर्माण करण्यासाठी पसायदान मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा रूपाली काणकोणकर यांनी अभ्युदयनगरच्या शहीद भगतसिंग मैदानावर भव्यदिव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून दीडशेपेक्षा अधिक पीळदार खेळाडू मंचावर अवतरले होते. विशेष म्हणजे उंची गटाच्या या स्पर्धेत वजनी गटाच्या संस्थेतील सात खेळाडू सहभागी झाले होते आणि त्यांच्याच गटातील विजय भोईरने सर्वांवर मात करत जेतेपदाचा मान मिळवला. विजेत्याला रोख 21 हजारांचा पुरस्कार आणि चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा प्रशांत काणकोणकर, रूपाली काणकोणकर, प्रवीण खामकर, प्रज्ञा खामकर, अरुण कुरळे व नंदकुमार तावडे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला खासदार अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, डॉ. जगन्नाथ हेगडे यांनीही भेट दिली.
पसायदान श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल
165 सेमी उंची गट ः 1. पुरुषोत्तम इरनाक (ठाणे), 2. अमित गाडापेल्ली (उपनगर), 3. अक्षय कोल्हटकर (ठाणे), 4. ज्ञानेश पुजारी (उपनगर), 5. प्रनिल कोडे (उपनगर). 165-170 सेमी उंची गट ः 1. आझाद जैनवाल (ठाणे), 2. निखील आंबोरे (उपनगर), 3. विवेक वडके (उपनगर), 4. संकेत दादागोल (कोल्हापूर), 5. विनायक घडसे (मुंबई). 170-175 सेमी उंची गट ः 1. संदेश सावंत (सिंधुदुर्ग), 2. स्वप्नील तेरवणकर (उपनगर), 3. रॅण्डॉल्फ डिसोझा (मुंबई), 4. योगेश यांगणकर (मुंबई), 5. अभिषेक सिंग (ठाणे). 175 सेमीवरील उंची गट ः 1. विजय भोईर (अमरावती), 2. अजय कडू (मुंबई), 3. भूषण पाटील (छाणे), 4. विनोद शेट्टी (मुंबई), 5. कपिल ठाकरे (शहापूर). बेस्ट पोझर ः विवेक वडके (मुंबई). पसायदान श्री ः विजय भोईर (अमरावती).