राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेच्या करिष्म्यामुळे अभूतपूर्व यश मिळाले. भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना शरद पवारांनी ‘बाप बाप होता है’ हे दाखवून दिले. ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सेनेला नकली सेना म्हणून हिणवले त्यांना देखील जनतेने धडा शिकवला. महाविकास आघाडीच्या सामूहिक प्रयत्नांचे हे मोठे यश असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमित जनतेने जुमलेबाजांना गाडले आहे. देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
मुंबई येथील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आज वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भाने सविस्तर चर्चा केली.
देशातील जनतेला संविधान आणि लोकशाही वाचविण्याची चिंता होती. त्यामुळे हे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने जुमलेबाज जोडीला बहुमत दिले नाही. सत्तेसाठी एकत्र आलेल्या जुमलेबाजांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवार करून पक्ष फोडले, विनाकारण नेत्यांना तुरूंगात डांबले. कायद्याचा गैरवापर केला. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला. या सत्ताधाऱ्यांच्या संकटापुढे जे टिकले त्यांचं कौतुक आहे. परंतु जे गेले त्यांचं राजकारण संपणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस संकटात असताना विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने विदर्भात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. ज्या भागातून राहुल गांधी यांची यात्रा गेली त्या ठिकाणी यश मिळाले. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, प्रभारी चेन्नीथला यांच्या सभा झाल्या त्या ठिकाणी देखील यश मिळालं आहे. याऊलट ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे जनतेने इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याचे सिद्ध झाले आहे.
भाजपच्या शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे. उदय सामंत जातीयवादी बोलत आहेत. त्यांना फक्त चिरा(दगड), आंबा, मासे इतकीच माहिती आहे. अवकाळी पावसासारखा त्यांचा आनंद आहे. अशा शब्दात त्यांनी शेलार आणि सामंत यांचा खरपूस समाचार घेतला. मोदी लाट संपली आहे. याचे भान या नेत्यांना नाही. अशा वाचाळवीरांमुळेच भाजप महाराष्ट्रात एक आकड्यावर आली आहे. त्यामुळे अशा नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असे देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
देशात बाबासाहेबांचा विचार मानणारा, संविधानाबद्दल आदर असणारा मतदार राजा आजही आहे. त्यामुळे जुमलेबाज टिकणार नाहीत, असा विश्वास देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.