मुंबईकरांसाठी आनंदवार्ता..! तुळशी, तानसानंतर विहार तलावही ‘ओव्हरफ्लो’

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील तुळशी, तानसानंतर गुरुवारी पहाटे विहार तलावही तुडुंब भरून वाहू लागला आहे. सध्या तलाव क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आगामी काही तासांमध्ये मोडक सागर तलावही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. सध्या हा तलाव 80 टक्क्यांहून अधिक भरल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्त्वाचा असणारा विहार तलाव गुरुवारी पहाटे 3.50 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 2769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) एवढी आहे. या तलावातून 90 दशलक्ष लीटर (9 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

विहार तलाव पालिका मुख्यालयापासून साधारणपणे 28.96 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या तलावाचे बांधकाम सन 1859 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 65.5 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 18.96 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 7.26 चौरस किलोमीटर एवढे असते, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

तत्पूर्वी बुधवारी दुपारी 4 वाजून 16 मिनिटांनी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 14,508 कोटी लीटर (145,080 दशलक्ष लीटर) एवढी आहे.

हा तलाव गतवर्षी दिनांक 26 जुलै 2023 रोजी पहाटे 4.35 वाजता, तर वर्ष 2022 मध्ये दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8.50 वाजता आणि सन 2021 मध्ये दिनांक 22 जुलै रोजी पहाटे 05.48 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.05 वाजता पूर्ण भरून वाहू लागला होता.

यापूर्वी 20 जुलै 2024 रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला. तर आता विहार तलावही तुडुंब भरल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी आतापर्यंत 3 तलाव पूर्ण भरून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.