निलंबित अधिकारी रवींद्र सिंह यादव यांच्या नोएडा आणि इटावा येथील ठिकाणांवर दक्षता विभागाने टाकलेल्या धाडीत 60 लाखांहून अधिक रुपयांचे दागिने आणि अडीच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. सध्या निलंबित असलेले रवींद्र यादव हे उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिह्यातील नोएडा विकास प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी आहेत. 18 तास चाललेल्या झाडाझडतीत यादव यांच्या 16 कोटी रुपये किमतीच्या घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली.
दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी रवींद्र यादव यांच्या नोएडा आणि इटावा येथील शाळेत शनिवारी हजेरी लावली. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी दक्षता विभाग कारवाई करत आहे. रवींद्र यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्यान्वये उत्तर प्रदेशच्या दक्षता विभागाने गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाकडून परवानगी मिळताच दक्षता विभागाने शाळेवर धाड टाकली.
16 कोटी रुपयांचे घर
दरम्यान, रवींद्र यादव राहत असलेल्या घराची किंमत 16 कोटी असून घरातील वेगवेगळ्या वस्तूंची एकूण किंमत 37 लाखांपर्यंत आहे. त्यांच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत. 12 एकरपेक्षा जास्त जमीन असलेली कागदपत्रे, 6 वेगवेगळ्या बँकेत खाती असल्याचा पुरावा आणि इटावातील घरात मलाजनी येथे असलेल्या शाळेची कागदपत्रे दक्षता विभागाच्या हाती लागली आहेत. 15 कोटी रुपये किंमत असलेल्या या शाळेचा अध्यक्ष त्यांचा मुलगा निखिल यादव हा आहे.