विद्याविहार पूर्वेकडील चित्तरंजननगर परिसरात नाल्याशेजारच्या अस्वच्छतेमुळे रहिवासी हैराण झाले असून त्यात भरीस भर म्हणून नाल्यातील साप आणि विंचवांनी रस्त्यावर येऊन ठाण मांडायला सुरुवात केली आहे. नाला आणि नाल्याशेजारी तातडीने साफसफाई करून दहशतीखाली असलेल्या रहिवाशांची सुटका करा, अशी मागणी शिव आरोग्य सेनेने पालिकेच्या एन विभाग कार्यालयाकडे केली आहे.
विद्याविहार पूर्वेकडील चित्तरंजननगर परिसरात रस्त्यावरून ये-जा करणाऱया पादचारी, महिला, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱया परिचारिकांसह अनेकांना काही दिवसांपासून नाल्याशेजारच्या रस्त्यावरून साप, विंचू दिसू लागले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. प्रत्यक्षदर्शीनी ही बाब माहिती शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी आणि विधानसभा संघटक सचिन भांगे यांच्या निदर्शनाला आणून दिली.
दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार
रस्त्यावर विंचू, साप यासारखे विषारी प्राणी फिरत असतात. दिवसा असे प्राणी डोळय़ांनी दिसतात, मात्र रात्री-अपरात्री असे प्राणी डोळय़ांनी दिसत नाहीत. अशा वेळी विंचू, साप चावून एखाद्या रहिवाशाच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला पालिका जबाबदार असेल, असा इशारा शिव आरोग्य सेनेने दिला आहे.