लय भारी….विडूळची जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले; शिक्षणात खासगी शाळांना टाकले मागे

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्यासमोर तुटलेल्या खिडक्या ,फुटलेल्या फरशा , वर्गखोल्या वरील टिनाला पडलेली छिद्रे , पडक्या भींती असं चित्र उभे राहते. त्यामुळे खासगी शाळांकडे ओघ वाढल्यामुळे जिल्हा परिषद शाळांना ओहोटी लागल्याचे बोलले जाते. मात्र, अनेक जिल्हा परिषद शाळांनी आपले रुपडे बदलत या समाजाला अपवाद ठरत आहेत. खासगी शाळांना मागे टाकणारी अशीच एक शाळा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याच्या विडूळ गावात आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या सुदूर भागात वसलेली ही जिल्हा परिषदेची शाळा आता खासगी शाळांना मागे टाकत आहे. या या शाळेमध्ये उपक्रमांची रेलचेल असते. विविध नावि्यपूर्ण उपक्रमांमुळे शिक्षणाचा दर्जा वाढत असून विद्यार्थ्यांमध्येही शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. तसेच या शाळेचा कायापालट झाल्याने पटसंख्याही वाढली आहे. परिसरातील खासगी शाळांना विडूळ नवी आबादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागे टाकत आहे.

येथील शिक्षकांनी ग्रॅन्ड मराठा फाऊंडेशनसह अनेक संस्थांकडून मदत मिळवित केवळ आठ महिन्यात शाळेचे रुपडे पालटले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात येथे बदलीने आलेले नागेश मिराशे या होतकरू शिक्षकाने मुख्याध्यापक भास्कर मुंडे, कोंडबा झाटे, सुवर्णा बाकडे यांच्या सहकार्याने ‘चेंज : बदल आबादीचा’ हा कृती आराखडा तयार केला. त्यानंतर देश-विदेशातील अनेक दात्यांकडे पाठपुरावा करून मदत मिळविली. त्यातून पेव्हर ब्लॉक, नवीन खिडक्या-दरवाजे, शौचालय दुरुस्ती, रंगरंगोटी व बोलक्या भिंती यासह दोन संगणक संच, विद्यार्जनासाठी अत्याधुनिक टॅब ,विद्यार्थ्यांसाठी शाळेत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप , कर्तृत्ववान लोकांची शाळेला भेट आणि विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद असे एक ना अनेक सृजनशील उपक्रम या शाळेत राबविले गेले आहेत. अगदी उन्हाळ्याच्या सुटीतही येथील शिक्षकांनी मेहनत घेत शाळेत हिरवीगार परसबाग निर्माण केली आहे. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थिनींच्या मातांसाठी शिलाई मशीन, गुणवंत विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती मिळविली आहे . एकेकाळी पडीत असलेली ही शाळा आता रंगरंगोटीसह विविध उपक्रमांमुळे पटसंख्या वाढीसाठी चर्चेत आली आहे .

शाळेच्या या उपक्रमामुळे मुले आवडीने शाळेत जातात, त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे इथले पालक सांगतात . शाळेत अनेक उत्तम शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे. त्यातून या शाळांची गुणवत्ता वाढत आहे.परिषद शाळेचा परिसर गोरगरीब, वंचित, उपेक्षितांचा आहे. त्यांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. लोकांनी मोलाची साथ दिल्यामुळे शाळेत भौतिक सुविधा निर्माण होऊन गुणवत्ता संवर्धनासाठी फायदा झाला.असल्याचे येथील उपक्रमशील शिक्षक नागेश मिराशे यांचे म्हणणे आहे.

आताचे जे पालक इंग्रजी शाळेचा हट्ट धरतात ते जिल्हा परिषद शाळांमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. आज जे काही प्रशासनात पदावर काम करणारे अधिकारी आहेत ते जिल्हा परिषद शाळांनीच घडविले आहेत . आज घडीला ज़िल्हा परिषद शाळा टिकविणे हाच केवळ प्रश्न नसून गुणवत्ता राखणे तितकेच महत्वाचे आहे . एकंदरीत ज़िल्हा परिषदेच्या शाळांनी विडूळ येथील शाळांचे अनुकरण केल्यास गल्लाभरू इंग्रजी शाळा आणि शिक्षणाचे बाजारीकरण होणार नाही.तसेच जिल्हा परीषद शाळेतील पटसंख्याही वाढणार आहे.