
पहिले दोन दिवस पिछाडीवर असलेला मुंबईचा संघ तिसऱ्या दिवशी आणखी पिछाडीवर पडला. 7 बाद 188 अशा अवस्थेत असलेल्या मुंबईला सामन्यात आणण्यासाठी आकाश आनंदने झुंजार शतक ठोकले, तरीही मुंबईचा डाव 270 धावांत गुंडाळून विदर्भने 113 धावांची जबरदस्त आघाडी घेत सामन्यावर पकड घेतली. त्यानंतर विदर्भने दुसऱ्या डावात उर्वरित 53 षटकांच्या खेळात 4 बाद 147 धावसंख्येपर्यंत मजल मारत आपली आघाडी 260 धावांपर्यंत वाढविली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यश राठोड (59) तर अक्षय वाडकर (31) खेळत होते.
विदर्भाच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने अथर्व तायडेला दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर पायचीत पकडून सनसनाटी सुरुवात करून दिली. मग तनुष कोटीयनने ध्रुव शौरीला 13 धावांवर पायचीत पकडून 10 षटकांतच विदर्भाची सलामीची जोडी तंबूत पाठविली. त्यानंतर शम्स मुलानीने आधी करुण नायरला (6) पायचीत पकडले, तर दानिश मालेवारला झेलबाद करून विदर्भाची 4 बाद 56 अशी दुर्दशा केली होती.
आकाश आनंदची शतकी खेळी
सकाळी सलामीवीर आकाश आनंदच्या शतकी खेळीने मुंबईची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या झुंजार शतकामुळेच मुंबईला पहिल्या डावात 92 षटकांत 270 धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्याला तनुष कोटियनने 33 धावांची खेळी करीत साथ दिली. मोहित अवस्थी 10 धावांवर बाद झाला, तर रॉयस्टन डायस 2 धावांवर नाबाद राहिला. विदर्भाकडून पार्थ रेखाडेने 4, तर यश ठाकूर व हर्ष दुबे यांनी 2-2 फलंदाज बाद केले. दर्शन नळकांडे व नचिकेत भुते यांनाही 1-1 विकेट मिळवला.
राठोड-वाडकर जोडीने सावरले!
मात्र त्यानंतर यश राठोड व कर्णधार अक्षय वाडकर या जोडीने पाचव्या विकेटसाठी 91 धावांची अभेद्य भागीदारी करीत विदर्भाला सावरले. राठोडने 101 चेंडूंतील संयमी खेळीत नाबाद 59 धावा करताना केवळ 4 चेंडू सीमापार पाठविले, तर वाडकरने 102 चेंडूंत 2 चौकारांसह आपली नाबाद 31 धावांची खेळी सजविली.
गुजरातचे केरळला चोख प्रत्युत्तर!
अहमदाबाद : रणजी करंडकाच्या अहमदाबादमधील दुसऱ्या उपांत्य लढतीत पहिल्या डावात 187 षटकांत 457 धावसंख्या उभारणाऱ्या केरळला गुजरातनेही चोख प्रत्युत्तर दिले. सलामीवीर प्रियांक पांचाल (खेळत आहे 117) व आर्या देसाई (73) यांनी 131 धावांची खणखणीत सलामी देत गुजरातला झकास सुरुवात करून दिली. नेदुमंकुझी बॅसिलने देसाईचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. त्यानंतर मनन हिंगराजियाने नाबाद 30 धावांची खेळी करीत पांचालला साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची अभेद्य भागीदारी करीत गुजरातला उर्वरित 71 षटकांच्या खेळात 1 बाद 222 धावसंख्या उभारून दिली.