जागांसाठी आग्रह करणार नाही, तीनही पक्ष एकत्र लढणार; स्थिर सरकार हेच आमचे उद्दिष्ट

आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या, याच जागा द्या असा आग्रह मी करणार नाही. राज्यात आम्ही तीनही पक्ष मिळून लढणार आहोत. राज्यात स्थिर सरकार आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार सध्या उत्तर पुणे जिह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवार यांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा महाराष्ट्र दौऱयावर येत आहेत. यावर शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत.

मनोज जरांगे यांना कोणती आश्वासने दिली, हे सरकारने सांगितले का? छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची माहिती आम्ही मागितली होती, मात्र आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही. त्यांच्यात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

भाजप व आरएसएसचे लोकच बोलत आहेत, शहाण्या माणसांनी नोंद घ्यावी

रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘एका व्यक्तीला सुपरमॅन व्हायचे आहे. त्यानंतर तो स्वतःत देवही पाहू लागतो,’ असे वक्तव्य भागवत यांनी केले होते. त्यावर आज शरद पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींवर हल्ला केला. ‘मोहन भागवत काय म्हणाले याची मला कल्पना नाही. ते कोणाविषयी बोलले तेही मला माहिती नाही. पण मध्यंतरी कुणीतरी देव बनायला निघाले होते. त्यावर आता भाजप व आरएसएसचे लोकच बोलत आहेत. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी,’ असे शरद पवार म्हणाले.