विधान परिषदेच्या चुरशीच्या लढतीत सर्वांसाठी सर्वकाही! शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सर्वांसाठी सर्वकाही असा लागला. 12 उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यात शिवसेना उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. भारतीय जनता पक्षाला 5, मिंधे आणि अजितदादांना प्रत्येकी 2 तर काँग्रेसला एक जागा मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

लोकसभेनंतर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतही विजय मिळवायचाच अशा आत्मविश्वासाने महाविकास आघाडी महिनाभर या निवडणुकीसाठी बैठका घेऊन रणनीती आखत होती. 11 जागा असताना  बारावा उमेदवार रिंगणात उतरल्याने फटका कुणाला बसणार यावर चर्चा रंगल्या होत्या. सकाळी 9 वाजता विधान भवनात मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सर्वच्या सर्व 274 आमदारांनी मतदान केले.

उमेदवार आणि त्यांना पडलेली मते

महाविकास आघाडी

शिवसेना मिलिंद नार्वेकर (24). काँग्रेस- प्रज्ञा सातव (25). शेकाप – जयंत पाटील – 12

महायुती

भाजप योगेश टिळेकर (26), अमित गोरखे (26), परिणय फुके (26), पंकजा मुंडे (26) आणि सदाभाऊ खोत (26). शिंदे गट भावना गवळी (24) आणि कृपाल तुमाने (25). अजित पवार गट राजेश विटेकर (23) आणि शिवाजीराव गर्जे (24)

विधानसभेतील विद्यमान आमदारांची संख्या 274 असल्यामुळे 11 आमदारांना विजयासाठी 23 चा कोटा निश्चित करण्यात आला. अपक्ष मिळून 112 भाजपकडे होती. भाजपचे चार उमेदवार प्रत्येकी 26 मते मिळवून विजयी झाले. सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीची मिळून 26 मते पडली. यावरून काँग्रेसची मते फुटल्याची चर्चा रंगली आहे. मिंधे गटाकडे 37 आणि अपक्ष अशी मतसंख्या होती. अजित पवार गटाकडे 39 मते आणि 4 अपक्ष असे बळ होते.

काँग्रेसची 8 मते फुटली

माझी 12 मते मला मिळाली, काँग्रेसची मते फुटल्याने मला कोटा गाठता आला नाही, असे जयंत पाटील यांनी निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेसची 8 मते फुटल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा विधानसभेत एकच आमदार होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आमदारांचा पाठिंबा होता तसेच महाविकास आघाडीचे मित्रपक्ष सोबत असल्याने जयंत पाटील यांच्याकडे 16 मते होती. विजयासाठी त्यांना आणखी 7 मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती, पण ते शक्य झाले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

विजयासाठी 23 मतांचा कोटा होता. जयंत पाटील वगळता इतर अकरा उमेदवार तो कोटा गाठण्यात यशस्वी ठरले.

शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना 24 मते मिळून ते विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 25 मते मिळाली. जयंत पाटील यांना 12 मते मिळाली.

भाजपच्या सर्व पाच उमेदवारांना प्रत्येकी 26 मते मिळाली.

गद्दारी करणारे आमच्या ट्रपमध्ये – नाना पटोले

या निवडणुकीत आम्ही ट्रप लावला होता. या ट्रपमध्ये बदमाश लोक सापडलेले आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली याबाबतचा अहवाल आम्ही हायकमांडला सादर केला आहे. त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

उल्हासनगरमध्ये मिंधे गटाच्या कार्यकर्त्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. मतदानासाठी आज त्यांना तुरुंगातून विधान भवनात आणण्यात आले होते. काँग्रेसने त्यांना मतदान करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने गायकवाड यांना अद्याप कुठल्याही कोर्टाने शिक्षा सुनावलेली नसल्याने मतदानास परवानगी दिली.