मिंधे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे हे सोमवारी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र त्याच वेळी विजय शिवतारे यांची गाडी पोलिसांनी गेटवर अडवली. त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकले होते. ‘तुम्हाला माजी मंत्री आमदार ओळखता येत नाही? असा शब्दात त्यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री पद हाती लागत नाही याची खात्री पटल्यानंतर इतर महत्त्वाची खाती मिळवण्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे. भाजपसोबत दिल्लीत बैठक झाल्यावर एकनाथ शिंदे थेट त्यांच्या साताऱ्यातील गावी गेले होते. गावी गेल्यानंतर शिंदेंना ताप चढला होता. तो रविवारी उतरल्याचा दावा करत त्यांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन पुन्हा ठाणे गाठले. पण शारीरिक ताप उतरला असला तरी शिंदेंचा राजकीय ताप मात्र वाढला आहे. गृह, नगरविकाससह महत्त्वाची खाती मिंधे गटाला देण्यास भाजपमधील अनेकांचा विरोध आहे.
त्यामुळे सध्या मिंधे गटातील नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. त्यासाठी विजय शिवतारे देखील शिंदेच्या ठाण्यातील बंगल्यावर आले होते. मात्र, पोलिसांनी शिवतारे यांची गाडी गेटवरच अडवली. त्यावर शिवतारे संतापले. “किती वर्ष झाले तुम्हाला इथे आहात? तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाहीत का?”, असे शिवतारे म्हणाले.