
मारहाणप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मारहाणप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले असून मारहाण खटल्याची 21 मार्चपासून व्हिडीओ रेकॉर्डिंग होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी 2014 साली गौतम बुद्ध यांच्या अस्थी त्यांच्या मतदारसंघात घेऊन येणार असल्याची जाहिरात केली. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता रोहित तांबे यांनी सदर घटनेची शहानिशा न करता जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर रोहित याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात आमदार राम कदम व इतर काही जणांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्र न्यायालयात याप्रकरणी खटल्यावर सुनावणी सुरू आहे. या खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, असा अर्ज फिर्यादीतर्फे अॅड. विनोद सातपुते यांनी दाखल केला आहे. या अर्जाची दखल घेत एससीएसटी कायद्याअंतर्गत या खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सत्र न्यायालयात या खटल्याचे 21 मार्चपासून व्हिडीओ रेकॉर्डिंग होण्याची शक्यता आहे.