एलोन मस्कच्या SpaceX चं पुन्हा अपयश; Starship फुटलं, अवकाशात दिसले भयंकर आगीचे गोळे

Video Debris Over Bahamas After SpaceX Starship Explodes

SpaceX च्या भव्य स्टारशिप अंतराळयानाचा गुरुवारी टेक्सासहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अवकाशात स्फोट झाला. यानंतर तात्काळ फ्लोरिडाच्या काही भागात हवाई वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. एलोन मस्कच्या मंगळ रॉकेट कार्यक्रमात या वर्षी सलग दुसऱ्यांदा अपयश आले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये दक्षिण फ्लोरिडा आणि बहामासजवळील आकाशात संध्याकाळच्या वेळी आगीचे गोळे पसरलेले दिसत आहेत. स्टारशिपचे इंजिन बंद पडल्यानंतर अवकाशात काही वेळातच त्याचे तुकडे झाले, असे स्पेसएक्सच्या लाइव्ह स्ट्रीममधून स्पष्ट पाहायला मिळाले.

गेल्या महिन्यातच सातवी चाचणी देखील अयशस्वी ठरली होती. सुरुवातीच्या काळात मोहिमेच्या टप्प्यात सलग दोन अपघात झाले आहेत. स्पेसएक्सने यावर्षी अंतराळ कार्यक्रमांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आताची स्थिती बघता हा कार्यक्रमासाठी एक धक्का आहे.

या दशकाच्या शेवटापर्यंत मंगळावर मानव पाठवण्याच्या मस्कच्या योजनेत 403 फूट (123 मीटर) रॉकेट प्रणाली महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

‘अवकाशातील आगीच्या गोळ्यांमुळे’ मुळे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने मियामी, फोर्ट लॉडरडेल, पाम बीच आणि ऑर्लँडो विमानतळांवर काही काळासाठी विमान वाहतूक सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या रॉकेटने स्पेसएक्सच्या टेक्सासमधील बोका चिका येथून संध्याकाळी 6:30 वाजता वाजता उड्डाण केले. मात्र काहीवेळातच इंजिन बंद पडले आणि अवकाशातच त्याचा स्फोट झाला.

‘दुर्दैवाने गेल्या वेळीही असेच घडले होते, त्यामुळे आता आम्हाला काही सराव करावा लागणार आहे’, असे स्पेसएक्सचे प्रवक्ते डॅन हुओट यांनी लाईव्ह स्ट्रीमवर सांगितले.