
तिसऱ्या दिवशी केरळचे दैव रुसल्यानंतर विदर्भचे पोट्टेच रणजी चॅम्पियन होणार, हे संकेत मिळाले होते. आज विदर्भने पहिले सत्र संयमाने खेळून काढीत आपले जेतेपद निश्चित केले आणि अखेर सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवत पाचव्या दिवसअखेर 9 बाद 375 अशी मजल मारत आपल्या तिसऱ्या रणजी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गेल्या सात वर्षांत आपल्या कामगिरीत सातत्य दाखवताना विदर्भने तिसऱ्यांदा बाजी मारण्याचा पराक्रमही करून दाखवला. पहिल्या डावात 153 आणि दुसऱ्या डावात 73 धावांची झुंजार खेळी करणारा दानिश मालेवार विदर्भच्या जेतेपदाचा मानकरी ठरला. तसेच यंदाच्या मोसमात 476 धावा आणि सर्वाधिक 69 विकेट टिपणारा अष्टपैलू हर्ष दुबे ‘मालिकावीर’ ठरला.
विजेता आणि उपविजेता अपराजित
यंदाच्या रणजी मोसमात विदर्भने अपराजित राहत जेतेपदाचे चुंबन घेतले तर केरळही शेवटपर्यंत अपराजित राहिला. रणजी करंडकाचा जेतेपदाचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावात घेतलेली 37 धावांची माफक आघाडी विदर्भला रणजी विजेतेपदाचा मान देण्यास पुरेशी ठरली. विदर्भने साखळीतील सातपैकी सहा सामन्यांत निर्णायक विजय मिळवले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावात त्यांनी आघाडी मिळवली होती. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तामीळनाडूचा तर उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सर्वात शेवटी अंतिम सामन्यात ते निर्णायक विजय मिळवू शकले नसले तरी पहिल्या डावाच्या आघाडीमुळे ते जेते ठरले. या मोसमात त्यांना पुणीही हरवू शकला नाही. दहापैकी आठ सामन्यांत विजय तर दोन सामन्यांत त्यांनी पहिल्या डावात आघाडी घेतली. अशीच काहीशी कामगिरी केरळची ठरली. साखळीतील केवळ 3 विजयांसह ते बाद फेरीत पोहोचले. अन्य चार अनिर्णित सामन्यात त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे गुण संपादले होते. बाद फेरीतील दोन्ही सामन्यांत त्यांनी एक आणि दोन गुणांच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवण्याची किमया साधली होती. अंतिम सामन्यातही त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती, मात्र त्यांचे दैव रुसले आणि विदर्भचे नशीब फळफळले.
केरळची सुरुवात जोरदार, पण…
करुण नायरच्या संयमी शतकाने विदर्भचे जेतेपद शनिवारीच निश्चित केले होते. शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात विदर्भचा डाव गुंडाळून केरळला अंतिम सामन्याचा थरार वाढवण्याची संधी होती. करुण नायर आपल्या धावसंख्येत 3 धावांची भर घालून 135 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर विदर्भच्या प्रत्येक फलंदाजाने कासवछाप फलंदाजी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवला. दर्शन नळकांडेने 51 धावांची खेळी करत संघाला 9 बाद 375 धावांपर्यंत नेले आणि अखेर दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
फलंदाजी आणि गोलंदाजीत विदर्भचाच जोर
या मोसमात विदर्भच्याच यश राठोडने सर्वाधिक पाच शतकांसह सर्वाधिक 960 धावा केल्या. तसेच करुण नायर (863), दानिश मालेवार (783) आणि अक्षय वाडकर (722) यांनीही फलंदाजीत आपली चमक दाखवत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही विदर्भचाच हर्ष दुबेने अव्वल स्थान राखले. त्याने 16.98 च्या सरासरीने रणजी इतिहासात एका मोसमातील सर्वाधिक 69 विकेटचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. दहा सामन्यांत पाच वेळा डावात 5 विकेट टिपणाऱ्या हर्षनंतर जम्मू-कश्मीरच्या आकिब नबीने 44 विकेट टिपल्या आहेत. यावरून हर्षने किती भन्नाट गोलंदाजी केली याचा अंदाज येतो.
विदर्भ जोरात
गेली सात वर्षे विदर्भचा खेळ बहरतच चालला आहे. 2017-18 साली दिल्लीचा पराभव करत त्यांनी आपले पहिलेवहिले रणजी जेतेपद संपादले होंते. त्यानंतर पुढच्याच वर्षी 2018-19 साली जामठ्यावर सौराष्ट्रला नमवत विदर्भने सलग दुसऱ्यांदा बाजी मारण्याचा पराक्रम केला. त्यानंतर 2020-21 च्या मोसमात त्यांना साखळीतच बाद व्हावे लागले. त्यानंतर 2022-23 च्या मोसमात विदर्भने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले, पण मुंबईने त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर विदर्भने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखताना मुंबईचाच पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि आता तिसऱ्यांदा अजिंक्यपदही संपादले.