Ranji Trophy – विदर्भनं वचपा काढला, मुंबईचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

गेल्या वर्षी फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत विदर्भने रणजी ट्रॉ़फी 2024-25 च्या सेमीफायनलमध्ये मुंबईचा 80 धावांनी पराभव केला. या विजयासह विदर्भने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये विदर्भचा सामना केरळशी होणार आहे.

विदर्भने विजयासाठी दिलेल्या 406 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा दुसरा डाव 325 धावांमध्ये आटोपला. शार्दुल ठाकूर 66, शम्स मुलानी 46, मोहित अवस्थी 34, तनुष कोटियन 26 आणि रॉयस्टन डायस नाबाद 23 या तळाच्या फलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते मुंबईला विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. विदर्भकडून हर्ष दुबेने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकूर आणि पार्थ रेखाडेने प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली.

सेमीफायनलमध्ये विदर्भने प्रथम फलंदाजी करताना 383 धावांचा डोंगर उभार होता. त्यानंतर मुंबईचा पहिला डाव 270 धावांमध्ये गुंडाळत 103 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. विदर्भने दुसऱ्या डावात आणखी 292 धावांची भर घालत मुंबईपुढे विजयासाठी 406 धावांचे आव्हान ठेवले. मात्र हे आव्हान मुंबईला पेलवले नाही. मुंबईचा संघ 97.5 षटकांमध्ये 325 धावांमध्ये गारद झाला.