
रणजी करंडक 2024-25 चा अंतिम सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर पार पाडला. हा सामना अनिर्णीत सुटला, परंतु पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर विदर्भाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. या विजयासह विदर्भाने सात वर्षांत तिसऱ्यांदा रणजी करडंक उंचावण्याची किमया साधली आहे. करुण नायर आणि दानिश कालेवर यांनी केलेली दमदार फटकेबाजी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
विदर्भाच्या विजयात करुण नायर आणि दानिश मलेवरा यांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. करुण नायरणे पहिल्या डावात 86 आणि दुसऱ्या डावात 135 धावांची खेळी केली होती. तर दानिशने पहिल्या डावात 153 धावा चोपून काढल्या होत्या. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात 379 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. प्रत्युत्तरात केरळच्या संघाला पहिल्या डावात 342 धावांपर्यंत पोहचण्यात यश आले. त्यामुळे विदर्भाकडे पहिल्या डावाच्या आधारावर 37 धावांची आघाडी होती. इथेच विदर्भाचा विजय निश्चित झाला होता. विदर्भाने शेवटच्या दिवशी 9 गड्यांच्या मोबदल्यात 375 धावा केल्या.
विदर्भाच्या संघाने 2017-18 च्या हंगामात पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला होता. त्यानंतर 2018-19 च्या हंगामात सलग दुसऱ्यांदा त्यांनी विजेतेपद पटकावले. मागील हंगामात सुद्धा विदर्भाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. पंरतु मुंबईच्या संघाने त्यांना पराभवची धुळ चारली होती.