विदर्भवाद्यांचा नागपूर विधान भवनावर झेंडा फडकवण्याचा डाव उधळला, पोलिसांकडून 350 कार्यकर्त्यांना अटक

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत नागपूर विधान भवनावर झेंडा फडकवण्याचा विदर्भवाद्यांचा प्रयत्न आज पोलिसांनी उधळून लावला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी 350 कार्यकर्त्यांना अटक केली. या आंदोलनामुळे नागपूर विधान भवन परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र एकसंध रहावा अशी सर्व महाराष्ट्रीयांची भावना असताना गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांकडून वेगळय़ा राज्याची मागणी करून आंदोलन करण्यात येत आहे. आता वेगळय़ा विदर्भाची मागणी आणखी तीव्र करण्यात आली असून थेट वेगवेगळय़ा विदर्भ राज्याचा ध्वज नागपूर विधान भवनावर फडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी आधीच विधान भवनावर वेगळय़ा विदर्भाचा झेंडा फडकवणार या आंदोलनाची घोषणा केल्याने पोलिसांनी विधान भवनाला चहुबाजूनी सुरक्षेचे कडे उभारले होते. कडक पोलीस बंदोबस्तामुळे त्यांचा डाव उधळला गेला.

वेगळे विदर्भ राज्य, शेतकऱयांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, वीज दरवाढ मागे घ्यावी आणि स्मार्ट मीटर लावू नये आदी मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळण्यात आला. तर आता 15 ऑगस्टनंतर कार्यकर्त्या मस्की यांनी बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.