युवासेनेचा सुप्रीम कोर्टातही विजय; सिनेट निवडणुकीविरोधातील याचिकाकर्त्याने याचिका घेतली मागे

>> मंगेश मोरे

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांचीच सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली. याचिका फेटाळून लावू की तुम्ही स्वतःहून याचिका मागे घेताय, असा खडा सवाल करीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली. त्यामुळे युवासेनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक घेण्यासाठी दिलेला आदेश कायम राहिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासू) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मोहिनी प्रिया, युवा सेनेतर्फे अ‍ॅड. सिद्धार्थ मेहता, मुंबई विद्यापीठातर्फे अ‍ॅड. युवराज नरवणकर आणि अ‍ॅड. अनिरुद्ध जोशी यांनी बाजू मांडली. सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने याचिकाकर्त्याला धारेवर धरले.

सिनेट निवडणुकीची मतदान प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. तसेच तुमची याचिका पूर्णपणे गुणवत्ताहीन आहे. याचिकेवर तुमचा युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी कुठलीही गुणवत्ता आम्हाला दिसून येत नाही. त्यामुळे गुणवत्ता नसल्याच्या आधारे आम्ही याचिका फेटाळण्याचा आदेश देऊ की तुम्ही स्वतःहून याचिका मागे घेताय? असा सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना केला. त्यावर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली.