केतकी धुरेच्या जोरावर भारत क्लबचा मोठा विजय

मधल्या फळीतील केतकी धुरेच्या 158 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत क्रिकेट क्लबने तिसऱया एमसीए महिलांच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ग्लोरियस क्रिकेट क्लबविरुद्ध 97 धावांनी विजय मिळवला.

केतकीने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखताना 116 चेंडूंमध्ये 22 चौकार आणि 4 षटकारांसह झंझावाती दीड शतकी खेळी केली. तिच्या फटकेबाज शतकी खेळीमुळे भारत सीसीने डाव 40 षटकांत 6 बाद 261 धावा उभारल्या.

प्रत्युत्तरात ग्लोरियस सीसीचा डाव 40 षटकांत 8 बाद 164 धावांवर संपला. साध्वी संजय (77 धावा) आणि वैष्णवी वर्मा (48 धावा) वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भारत सीसीकडून कशिश निर्मल 37 धावांत 2 आणि निर्वाण राणे 26 धावांत 2 विकेट घेत मोठा विजय आणखी सुकर केला.

डॉ. डी. वाय. पाटील एसएने केआरपी इलेव्हन क्रिकेट क्लबला 137 धावांनी पराभूत केले. स्वरा खेडेकरची नाबाद शतकी खेळी (115 चेंडू, 12 चौकार) तसेच लावण्या शेट्टी (8 धावांत 3 विकेट), वर्षा नागरे (28 धावांत 3 विकेट), प्रिया मेहताने आणि मेगन रॉड्रिग्जची (प्रत्येकी 2 विकेट) प्रभावी गोलंदाजी केली.