
महिलेला आपले विवस्त्रे फोटो पाठवल्यामुळे गोत्यात आलेले भाजपचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी आपण निर्दोष सुटल्याचा दावा मीडियासमोर केला. त्यावर या प्रकरणातील पीडित महिलेने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लबाड, नालायक माणसाने अर्धसत्य सांगून मीडियाची दिशाभूल केली आहे. न्यायालयाने त्यांना ‘बाइज्जत’ सोडलेले नाही, तर त्यांनी कोर्टात माझ्यापुढे लोटांगण घालून माफी मागितली म्हणून केस संपली. हे सत्य त्यांनी मीडियाला सांगितले नाही. गोरे यांच्यामुळे आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागत असून हा त्रास थांबत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण सुरूच ठेवणार आहोत, असा निर्वाणीचा इशारा पीडित महिलेने दिला आहे.
पीडित महिला म्हणाली की, कोर्टातील केसनंतर मी हा विषय सोडून दिला, पण त्यांनी सोडलेला नाही. माझ्या नावे पत्र व्हायरल करणे, माझी बदनामी करणे, माझ्याबद्दल त्यांचे कार्यकर्ते घाणेरडे बोलणे करतात. पुण्यात फ्लॅट दिलाय, दोघेही दुबईला गेले होते, असं खोटनाटं पसरवत आहेत. तेव्हाच मी ठरवलं की, या प्रकरणाला वाचा फोडल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. याप्रकरणी आपण 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण सुरू करणार असून आपली बदनामी थांबत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे या महिलेने म्हटले आहे.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हे प्रकरण प्रचंड तापल्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांनी मीडियासमोर बाजू मांडली. त्यात, आपली या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, आपण फोटो पाठवले नाहीत. आपली बदनामी करणाऱयांविरुद्ध हक्कभंगासह अब्रूनुकसानीचे खटले दाखल करण्यापर्यंत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर संबंधित पीडित महिलेने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हा अतिशय लबाड व नालायक माणूस आहे. त्यांनी मीडियाची दिशाभूल केली असून ते अर्धसत्य सांगत आहेत.
2016 साली एफआयआर दाखल केल्यानंतर केस चालू होती. 19च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना या केसचा त्रास होत होता. तेव्हा केस मिटवण्यासाठी ’मी चुकलो, मला माफ करा आणि मला यातून बाहेर काढा, मी परत तुम्हाला त्रास देणार नाही’ असा लेखी माफीनामा कोर्टात दंडवत घालून दिल्यामुळे त्यांची मुक्तता झाली. कोर्टाने त्यांना ‘बाइज्जत बरी’ केले नाही, हे त्यांनी सांगायला हवे होते. हा प्रकार घडलाच नव्हता, तर उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळला? त्यांना दहा दिवस जेलमध्ये का राहावे लागले? अशी सरबत्ती या महिलेने केली.
नोटीस आल्यावर उत्तर देऊ – रोहित पवार
कुठलीही महिला असेल आणि तिला न्याय मिळत नसेल, तर आम्ही तो विषय मांडू असे म्हटले होते. त्यात आम्ही चुकीचे काय केले? नोटीस आल्यावर उत्तर देऊ, असे आमदार रोहित पवार म्हणाले. आम्ही खालच्या लेव्हलला जात नसतो. जयकुमार यांना विषय आणखी मोठा करायचा असेल, तर त्याबाबतीत आम्ही बघू, असही रोहित पवार म्हणाले.
‘ते’ फोटो न्यायालयाच्या ताब्यात आहेत
गोरे यांनी मला पाठवलेले विवस्त्रे फोटो न्यायालयाच्या ताब्यात आहेत. ते फोटो काय त्यांच्या बारशाचे आहेत का, असा संतप्त सवाल या महिलेने केला आहे. त्याचवेळी या प्रकरणाच्या अनुषंगाने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा उल्लेख कोणी करू नये, अशी विनंतीही या महिलेने केली आहे.
माझी विनयभंगाची केस दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांनी माझ्याविरुद्ध दहिवडी पोलिसात खंडणीची तक्रार दाखल झाली. आज नऊ वर्षे झाली तरी त्या केसचे काही झाले नाही. मग माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दिल्याबद्दल त्यांचा पीए व सहआरोपी म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. विनयभंगाची केस मागे घ्यावी म्हणून दबाव आणण्यासाठी त्याचप्रमाणे मला बदनाम करण्यासाठी ही तक्रार केली होती असे पीडितेने सांगितले.
हक्कभंग आणणारे जयकुमार गोरे यांचे काळे कारनामे उघड, आणखी एक महिला दोन दिवसांत पुराव्यासह तक्रार दाखल करणार
माझी बदनामी झाली असे सांगत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणणाऱया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे काळे कारनामे उघड होऊ लागले आहेत. विकृत मानसिकतेच्या गोरे यांनी आणखी एका महिलेसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. माझे गोरे यांच्याबाबत जे मत आहे, तेच तिचेही मत आहे. ती येत्या दोन दिवसांत पुराव्यासह तक्रार दाखल करणार असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.
संजय राऊत, रोहित पवार, लय भारी यूटय़ूब चॅनलविरुद्ध विधानसभेत हक्कभंग
प्रसारमाध्यमातून बिनबुडाची आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून बदनामी केल्याच्या मुद्दय़ावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि लय भारी यूटय़ूब चॅनेलचे तुषार खरात यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयकुमार गोरे यांचे हे तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला.