जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, वयाच्या 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी मालिकाविश्वात आणि चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारे जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले. वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विलास उजवणे हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. विलास उजवणे यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

डॉ. विलास उजवणे यांची ओळख वादळवाट मालिकेतूनच आपल्याला झाली. उजवणे यांनी मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजनविश्वात काम केले होते. उजवणे यांना गेल्या काही वर्षांपासून ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता. त्यावर त्यांनी मात केली. परंतु त्यानंतर त्यांना हृदयासंबंधी विकार झाला. यामुळे त्यांची तब्येत दिवसागणिक अधिक खालावली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

विलास उजवणे यांनी ‘वादळवाट’, ‘दामिनी’, ‘चार दिवस सासूचे’ आदि अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. उजवणे यांनी आतापर्यंत 110 सिनेमे आणि 140 मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय हिंदी सिनेसृष्टीतही ही काम केले आहे. झी मराठीवरील ‘वादळवाट’ या मालिकेमुळे घराघरात पोहचले. विलास उजवणे यांनी ’26 नोव्हेंबर’ या आगामी सिनेमातही काम केले आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.