ज्येष्ठ अभिनेते-निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते  प्रकाश भेंडे यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होत. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे या जोडीने मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रकाश भेंडे उत्तम चित्रकारही होते.  त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात प्रसाद आणि प्रसन्न ही मुले आणि सुना, नातवंडे असा परिवार आहे. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिह्यातील मुरूड-जंजिराचा.  त्यांचे वडील डॉक्टर होते. भेंडे यांचे बालपण गिरगावात गेले. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. ते टेक्स्टाईल डिझायनर झाले. त्यांनी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये टेक्स्टस्टाईल डिझायनर म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. चित्रपटसृष्टीत ते फार उशिरा आले. ‘भालू’सारख्या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला. ‘भालू’ चित्रपटात त्यांनी आणि त्यांच्या पत्नी उमा यांनी साकारलेली नायक-नायकांची भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.