दुरिया दिलों में बढती ही जा रही है… धर्मेंद्र यांची अस्वस्थ करणारी पोस्ट

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आपल्या ‘मस्तमौला’ जगण्यासाठी ओळखले जातात. 89 व्या वर्षीदेखील ते सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि चाहत्यांशी संवाद साधतात. मात्र त्यांची नवी पोस्ट चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी ठरली आहे. दुरिया दिलों की बढती ही जा रही है… असे म्हणत बॉलीवूडच्या हिमॅनने साऱ्यांना अस्वस्थ केले.

धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर केला. त्यांनी फोटोला कॅप्शन दिले की, दुरिया दिलों में बढती ही जा रही हैं…कब मिलेगा छुटकारा…इन गलतफहमियों से. धर्मेंद्र यांची ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली आणि चाहत्यांनी त्यांच्या काळजीपोटी अनेक सवाल कमेंट्सद्वारे केले. सदाबहार अभिनेत्याला कसले टेन्शन आलेय, ते कुणापासून दुरावले, असे प्रश्न नेटिजन्सला पडले. अनेकांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या धर्मेंद्र यांनी आपल्या अनोख्या अभिनयाने एकेकाळी सिनेपडदा गाजवला आहे. या वयातही ते अभिनय करतात.