
>> गणेश जेवरे
प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या मल्लयुद्धात सोलापूरच्या वेताळ शेळकेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलवर 7-1 अशा गुणाधिक्याने मात मारत मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरून 66 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत विजेतेपदाची गुढी उभारली.
‘डबल महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेला पराभूत करणारा माजी‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटील जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र वेताळ ऊर्फ दादा शेळकेने शक्ती आणि युक्तीचा मोठ्या चपळाईने मेळ घालत पृथ्वीराजला निष्प्रभ करीत नवा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरविले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वेताळ शेळकेला मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.
रविवारी अतिशय देखण्या आणि रुबाबदार वातावरणात पार पडलेल्या स्पर्धेत रात्री बरोबर 8 वाजून 32 मिनिटांच्या ठोक्याला ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची सलामी झडली. गादी विभागातील विजेता पृथ्वीराज पाटील व माती विभागातील विजेता वेताळ शेळके या तुफानी मल्लांमध्ये खडाखडी सुरू झाली. पृथ्वीराज हा वेताळपेक्षा थोडा बलदंड दिसत होता. सुरुवातीच्या सावध पवित्र्याने व वेताळच्या निष्क्रयतेमुळे पंचांनी पृथ्वीराजला एक गुण बहाल केला. पृथ्वीराज पुनः पुन्हा पटात घुसत होता, तर वेताळही तितकाच भक्कम बचाव करीत डाव धुडकावत होता.
बेसावधपणाने केला पृथ्वीराजचा घात
पृथ्वीराज पाटील अधिक आक्रमकतेमुळे वरचढ वाटत होता. मात्र आखाडय़ावरील बेसावधपणाने त्याचा घात केला. वेताळच्या पटात घुसल्यानंतर पंचांची शिट्टी वाजण्यापूर्वीच पृथ्वीराज उठला अन् पाठमोरा झाला. सोलापूरच्या आग्या वेताळने या बेसावधपणाचा फायदा उठवित त्याला बॅक थ्रो मारत चार गुणांची कमाई केली. सुरुवातीला पंचांनी वेताळला दोनच गुण दिले होते, मात्र यावर वेताळच्या प्रशिक्षकांनी चॅलेंज घेतलं व रिप्लेमध्ये नियमानुसार वेताळला 4 गुण मिळाले. 4-1 असे आघाडीवर गेल्याने वेताळचे मनोबल कमालीचे उंचावले. त्याने आधी पृथ्वीराजच्या एकेरी पटातून एक गुण वसूल केला. पुन्हा पाठीवर स्वार होत 2 गुणांची कमाई करीत ‘महाराष्ट्र केसरी’च्या किताबावर शिक्कामोर्तब केले.
स्वप्न सत्यात उतरलं!
अगदी लहानपणापासून मी ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचं स्वप्न बघितलं होतं. अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे स्वप्न सत्यात उतरल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. या विजेतेपदासाठी मी मोठी तपश्चर्या केली होती. पृथ्वीराज पाटीलसारख्या तगडया मल्लाचे आव्हान माझ्या पुढे उभे ठाकले होते, मात्र 2022च्या एका स्पर्धेमध्ये मी त्याला हरविल्याने मनात विजयाचा आत्मविश्वास होताच. अन् मी आज ‘महाराष्ट्र केसरी’ झालोय. हा संस्मरणीय किताब मी माझे वस्ताद काकासाहेब पवार, माझे प्रशिक्षक आणि आई-वडिलांना समर्पित करतो. – वेताळ शेळके