कंपनीच्या उद्योगामध्ये मुदत ठेवीच्या रकमेवर 7 ते 10 टक्के व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 147 गुंतवणूकदारांना 17 कोटी 95 लाख 75 हजार रुपयांचा चुना लावून पसार झालेला वेंकटरमन गोपालन याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
वेंकटरमन गोपालन (53) हा मे. जी.व्ही.आर. एक्सपोर्टस् अॅण्ड इम्पोर्टस् या कंपनीचा प्रोप्रायटर असून चेन्नई येथे या कंपनीचा उद्योग आहे. शेतमालाची आयात व निर्यात करण्याचा उद्योग असल्याची बतावणी त्याने केली होती. उद्योगाच्या वाढीसाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होणे आवश्यक होते. त्यामुळे गोपलन याने गुंतवणुकीच्या ठेव रकमेवर मासिक 7 ते 10 टक्के व्याजासह परतावा देण्याची योजना आखून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. त्याने दाखवलेल्या प्रलोभनाला खरे समजून डिसेंबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत तब्बल 148 गुंवणूकदारांनी मिळून 17 कोटी 94 लाख 75 हजार इतकी गुंतवणूक केली. इतका पैसा आल्यानंतर गोपालन याने गुंतवणूकदारांना ठेंगा दाखवत पळ काढला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे कळताच गुंतवणूकदारांनी तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो वारंवार राहते ठिकाण बदलत होता. अखेर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बाग, निरीक्षक संजय लोंढे, उपनिरीक्षक मनोज कदम तसेच नलावडे, आव्हाड या पथकाने कसून शोध घेत वेंकटरमन याला आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून ताब्यात घेतले.