ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीने अत्यंत चुरशीच्या लढतीत किंग्जले स्पोर्ट्स क्लबवर केवळ 4 धावांनी मात करत 12 वर्षांखालील मुलांच्या ड्रीम इलेव्हन कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 30 षटकांत 7 बाद 192 धावा केल्या होत्या तर या धावांचा जबरदस्त पाठलाग करताना किंग्जले स्पोर्ट्स क्लबने 8 बाद 188 अशी मजल मारली. त्यांचा संघ या संघर्षात केवळ चार धावांनी कमी पडला.
संक्षिप्त धावफलक – वेंगसरकर क्रिकेट अकादमी – 30 षटकांत 7 बाद 192 (विहान अस्वले 38, निखिल अहिरवाल 59, स्तवन मोरे नाबाद 54, आकाश त्रिपाठी 19; अद्विक देसाई 25 धावांत 2 बळी) वि.वि. किंग्जले स्पोर्ट्स क्लब – 30 षटकांत 3 बाद 188 (दर्श मातले 26, शार्दुल पटनाईक 38, रीदीत पुजारी 65, श्लोक गवळी नाबाद 33)
चांगल्या सवयी-शिस्त लावा, कारकीर्दीत फायदा तुम्हालाच होईल
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर विजेत्या संघाचे अभिनंदन करताना म्हणाले, तुम्ही या वयातच स्वतःला चांगल्या सवयी लावल्यात आणि चांगली शिस्त लावली तर पुढील कारकीर्दीत यशस्वी वाटचाल करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होईल असे सांगितले. खेळून घरी गेल्यानंतर आपले किट, बूट, पॅड्स, ग्लोव्हज, बॅट आदी गोष्टी योग्य जागेवर ठेवण्याची सवय लावून घ्या आणि नेहमीच स्वतःचा खेळ उंचावण्यावर लक्ष्य केंद्रित करा, असा सल्ला त्यांनी या छोटय़ा खेळाडूंना दिला. यावेळी महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज मिलिंद कुलकर्णी, ड्रीम इलेव्हनचे प्रशासकीय अधिकारी नवीन फर्नांडिस आणि प्रशांत तायडे आणि ऍड. दीपक ठाकरे उपस्थित होते.