लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी; नागरिकांनी घेतला वनभोजनाचा आनंद

लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसह, मित्र परिवार, नातेवाईक यांनी वनभोजनाचा आनंद घेतला. शहर आणि गावातील रस्ते आज सुनसान होते तर शेतशिवार माणसांनी फुलून गेले होते. लातूर जिल्ह्यात वेळ अमावास्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येते. यावेळी तर सलग तीन दिवस सुट्टी असल्याने शुक्रवारी दुपारनंतर अनेकांनी गावाकडची वाट धरलेली होती. काट्याकुटाचा रस्ता तुडवत सर्वांची पावले शेतशिवाराकडे वळत होती. भज्जी, आंबील, उकडीचे ज्वारी, बाजरीचे उंडे, चपाती, पुरणपोळी, तीळाची पोळी, गव्हाची खीर, धपाटे, कच्ची मेथी, कांदा, ज्वारी बाजरीची भाकरी असे विविध पदार्थ खाऊन झाडाखाली थोडी झोप घेऊनच सर्व जण परतीला निघतात.

निलंगा तालुक्यातील कासार सिरसी व परिसरात वेळ आमवस्या हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेळ आमावस्या म्हणजे ग्रामीण भाषेत ‘ येळवस ‘ हा सण मूळ कर्नाटकातील असला तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा सण साजरा केला जातो. मार्गशीष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या. शेतकरी शेतीला आई समजून त्याची मशागत करतो. त्याच्यातून धान्य पिकवतो व त्याच्यातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो अशा काळ्या आईची कृतज्ञता व्यक्त करण्याचा शेतकऱ्यांचा हा दिवस. या दिवशी गावात अघोषित संचारबंदी होऊन प्रत्येक शिवार माणसांच्या गर्दीने फुलवून जातो. थंडीच्या या काळात विविध भाज्या शेतामध्ये उपलब्ध असतात, त्या सर्व भाज्यांचे मिश्रण करून त्याची भाजी (भज्जी) बनवली जाते. तर बाजरीच्या पिठा पासून उकडलेले बाजरीचे उंडे बनवले जातात. हा सण थंडीच्या ऋतूमध्ये असल्याने उष्ण पदार्थापासून बनलेल्या अन्नाचा यात समावेश होतो.

भज्जी , गुळ घालून बनवलेली खीर , बाजरीचे उंडे , वांग्याचे भरीत, तिळासोबत बनविलेल्या बाजरीच्या भाकरी याबरोबरच हे अन्न पाचविण्यासाठी ज्वारीचे पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली स्वादिष्ट आंबील असे जेवण या दिवशी केले जाते. त्याचबरोबर रानातील विविध रानमेव्याचा आनंद या दिवशी लुटला जातो. बोर, मोहोळ, बीबीचे फुलं अशा अनेक रानमेव्याचा आनंद या दिवशी घेण्यात येतो. इतर वेळी शेताकडे न फिरकणारेही आजच्या दिवशी शेतात थांबून मनसोक्त निसर्गाचा आनंद घेतात. त्यानंतर परतीची वाट धरतात. पुढील वर्षी हा सण कधी येईल याची आतुरतेने वाट पाहतात.