भाजीविक्रेत्याने लिहिली 18 पुस्तके; फावल्या वेळेचा केला सदुपयोग, आसाम सरकारकडून सन्मान

एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ती गोष्ट करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आसाममधील एका भाजीविक्रेत्याने फूटपाथवर भाजीविक्रीचा धंदा करत तब्बल 18 पुस्तके लिहिली आहेत. लक्षीराम दुवरा दास असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. ते गेल्या 20 वर्षांपासून भाजी विक्रीचा धंदा करतात. भाजी विक्रीचा व्यवसाय करत असताना मिळालेल्या फावल्या वेळात मोबाईल न पाहता त्यांनी पुस्तके लिहिण्याचा छंद जोपासला आहे. त्यांना लिहिण्याची आवड असून 18 पुस्तके लिहिल्यानंतर याची दखल आसाम सरकारने घेतली आहे. सरकारकडून त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.

लक्षीराम हे देशातील सर्वात मोठे नदी बेट असलेल्या माजुली येथील कैवर्ते गावचे रहिवासी आहेत. मणिकांचन संयोग, श्रीमद्भागवत शब्दार्थ, श्रीकृष्ण गीता शब्दार्थ त्यांनी सोप्या आसामी भाषेत लिहिले आहेत. सरकारसोबत आसाम साहित्य सभेनेसुद्धा लक्षीराम यांना सन्मानित केले आहे. तसेच कोच राजबंशी विद्यार्थी संघटनेनेसुद्धा त्यांचा सत्कार केला आहे.  लक्षीराम हे बीएच्या तृतीय वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून भाजी विक्रीचा धंदा सुरू केला.

पुस्तक प्रकाशित करण्यासाठी घर विकले

माझे पहिले पुस्तक ‘हरिभक्ती अमृतवाणी’ लिहिले तेव्हा ते पुस्तक छापण्यास कोणीच तयार होत नव्हते. मी पुस्तक छापण्यासाठी स्वतःचे घर विकले. त्यातून मला 50 हजार रुपये
मिळाले. त्यानंतर मी हे पुस्तक प्रकाशित करू शकलो. त्यानंतर माझे कौतुक केले. मला सन्मानित केले. सुंदर बुढागोहाई आसाम पोलिसात आहेत. त्यांनी लक्षीराम यांची सर्व पुस्तके वाचली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, लक्षीराम यांची पुस्तके आपल्याला स्वतःचे मूल्यांकन करण्यास भाग पाडतात.

घरावर हल्ला, मग अध्यात्माकडे वळलो

पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर काही तरुणांनी माझ्या घरावर हल्ला केला. घरातील सर्व सामान तोडून फोडून टाकले. त्यांनी हे का केले हे मला अखेरपर्यंत कळले नाही, परंतु मी या हल्ल्यानंतर आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली. मला वाटले की कुठेतरी मी काहीतरी चूक केली असेल. तेव्हा ही घटना घडली. यानंतर माझी आध्यात्मिक पुस्तकांमध्ये आवड वाढू लागली आणि मी अध्यात्माकडे वळलो, असे लक्षीराम यांनी सांगितले.