वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील पार्किंग 20 रुपयांवरून 80 रुपयांवर, आठ वर्षांनंतर एकाच वेळी चार पट वाढ

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील चार चाकी गाडय़ांच्या पार्किंगचे शुल्क 20 रुपयांवरून थेट 80 रुपये करण्यात आले आहे, तर दुचाकींना पार्किंगसाठी असणारे दहा रुपयांचे शुल्क 30 रुपये करण्यात आले आहे.

देशातील एकमेव पेंग्विन सफारी असलेले आणि मुंबई-महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. पेंग्विन आणल्यानंतर उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न तब्बल सहा ते आठ पटींनी वाढले आहे. या ठिकाणी प्रवेशासाठी लहान मुलांना प्रत्येकी 25 रुपये, मोठय़ांसाठी प्रत्येकी 50 रुपये आणि दोन मुलांसह दोन मोठय़ांसाठी चार जणांच्या कुटुंबाला एकत्रित 100 रुपयांत संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालय पाहता येत आहे. पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. शिवाय या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर वाघ, बिबटय़ा, हत्ती, हरीण, तरस, माकड, सरपटणारे प्राणी आणि शेकडो पशु-पक्षी व दुर्मिळ, औषधी झाडे पाहता येतात. या ठिकाणी येणाऱ्या मोठय़ा प्रमाणावरील पर्यटकांकडे स्वतःची वाहने असतात. त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी पार्किंगचीही व्यवस्था आहे. या पार्किंगसाठी आता जानेवारीपासून दरवाढ लागू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

म्हणूनच केली वाढ

प्राणी संग्रहालयाच्या आवारात परिसरातील दुकानदारही आपली वाहने आणून लावतात. या ठिकाणी संपूर्ण दिवसभर वाहने पार्क करून फक्त दहा ते वीस रुपये जमा केले जात होते. त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसानही होते. शिवाय काही जणांकडून या पार्किंगचा गैरफायदा घेतला जात असल्याने ही दरवाढ केल्याची माहिती उद्यान संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

भाऊ दाजी लाड संग्रहालयाचीही तिकीट दरवाढ

उद्यान व प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या तिकीट दरातही आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी असणारे पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये तर प्रौढांसाठी असणारे दहा रुपयांचे तिकीट 20 रुपये करण्यात आले आहे. या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून नुकतेच वास्तूचे नूतनीकरण, डागडुजी करण्यात आली आहे.