राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली, उत्पन्नावर परिणाम

भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही घट झाली आहे. गेल्या तीन वर्षात राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या 21 टक्क्यांनी घटली आहे.

2023-24 दरम्यान 28.97 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. तर यात घट होऊन एप्रिल 2024-25 दरम्यान 23.57 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. 2023-24 साली पर्यटकांच्या माध्यमातून पालिकेला 11.46 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पालिकेला 9.18 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

2024 च्या मे आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती, या महिन्यात शाळकरी मुलांना सुट्टी असते म्हणून पर्यटक संख्येत वाढ झाली होती. 2022-23 साली 30 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती, तेव्हा पालिकेला 11.59 कोटी रुपयांचे उत्पन्न आले होते.

पर्यटकांना सतत नवीन काही तरी हवं असतं त्यामुळे पर्यटकांची संख्या घटली असावी असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राणीच्या बागेत आम्ही मगर आणि सुसरींचे प्रदर्शन भरवले होते, तसेच गुजरातहून सिंह आणायचेही प्रयत्न सुरू आहे असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.