महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा कुमार व मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा कारनामा करत दुहेरी जेतेपदाचा मान मिळविला.
महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्ट्स स्टेडियमवर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कुमार गटाचे हे 19 वे तर मुलींचे दहावे सलग विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण 35 वे तर मुलींचे 26 वे राष्ट्रीय अजिंक्यपद ठरले आहे.
शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटांत ओडिशा संघाला नमवित ही कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (3.30, 2.30 मि. संरक्षण व 2 गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिशावर 24-20 असा 4 गुण व 5.10 मिनिटे राखून ओडिशाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी 14-10 अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (2.10 मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (1.30 मि. संरक्षण), प्रणाली काळे (1.10 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिशाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (1.20 मि. संरक्षण व 6 गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (2 मि. संरक्षण) दुसऱया डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर 33-29 अशी 1.30 मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची 18-14 ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे, कृष्णा बनसोडे, यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात साथ दिली. ओडिशाकडून बापी मुरमु , सुनील पात्रा यांची लढत अपुरी पडली.
सुहानी धोत्रे ‘जानकी’, जितेंद्र वसावे ‘वीर अभिमन्यू’चे मानकरी
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा ‘वीर अभिमन्यू’ पुरस्कार जितेंद्र वसावेला तर सुहानी धोत्रे ‘जानकी’ पुरस्काराची मानकरी ठरली. दोघेही धाराशीवचे आहेत.
अन्य मानकरी ः आक्रमक ः प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडिशा), संरक्षक ः बापी मुरमु (ओडिशा), तन्वी भोसले (धाराशीव, महाराष्ट्र).